US-Iran War : तणाव पुन्हा चिघळला.! अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला; तेल पुरवठ्यावर परिणाम
या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक आणि तेलपुरवठा मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला आहे. जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली.

US-Iran War : मध्यपूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून दोन्ही देशांकडून परस्पर लष्करी कारवायांचे दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. या घडामोडींमुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणकडून काही अमेरिकन लष्करी तळांच्या दिशेने ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, अमेरिका आणि सहयोगी देशांच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी बहुतांश हल्ले हवेतच निष्फळ ठरवल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, अमेरिकेकडूनही इराणमधील काही धोरणात्मक ठिकाणांवर प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. विशेषतः केशम बेट परिसरात लक्ष्यांवर हवाई हल्ले झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र या कारवायांचे नेमके परिणाम किती झाले याबाबत स्वतंत्र पुष्टी नाही.
इराणच्या लष्करी प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलताना अमेरिका आणि तिच्या सहयोगी देशांना इशारा देत, कोणत्याही आक्रमक कारवाईला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल असे म्हटले आहे. तसेच काही अमेरिकन लष्करी तळांवर यशस्वी हल्ले केल्याचा इराणचा दावा आहे, मात्र अमेरिकेने हे सर्व दावे फेटाळले आहेत.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने स्पष्ट केले की, इराणकडून करण्यात आलेले बहुतेक हल्ले निष्फळ ठरले असून ते लक्ष्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत किंवा हवाई संरक्षण प्रणालीने त्यांना रोखले.
या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक आणि तेलपुरवठा मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला आहे. जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून अनेक देशांच्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत आहे.
विशेषतः भारतासह अनेक देशांचा कच्च्या तेलाचा पुरवठा या मार्गावर अवलंबून असल्याने चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत काही पर्यायी पुरवठा मार्ग सक्रिय करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.






