अमेरिका-इराण चर्चा लांबणीवर; इराणविरोधात अमेरिकेच्या आक्रमक हालचाली सुरू
दुबई – अमेरिका आणि इराणमध्ये सध्या अणू कराराशी संबंधित वाटाघाटी सुरू आहेत. त्या चर्चेची चौथी फेरी शनिवारी होणार असे निश्चित झाले होते. मात्र आता ही चर्चा पुढे ढकलली गेली आहे. या चर्चेसाठी आतापर्यंत ओमानने मध्यस्थी केली होती. आता ओमाननेच या चर्चेची चौथी फेरी लांबणीवर टाकण्यात आल्याचे जाहीर केले आहे. ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र अल-बुसेदी यांनी एक्सवर या संदर्भातील पोस्ट गुरुवारीच केली आहे.
चर्चेसाठीच्या पुर्वतयारीशी संबंधित कारणांवरून ही चर्चा लांबवणीवर टाकण्यात येत असल्याचे बुसेदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ही चर्चा शनिवारी होणार होती. मात्र आता चर्चेच्या पुढच्या फेरीची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. परस्पर सामंजस्यातून नवीन तारीख निश्चित करण्यात येईल, असे बुसेदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मात्र या संदर्भात बुसेदी यांनी अधिक कोणताही तपशील दिलेला नाही. चर्चा लांबणीवर टाकली जाण्याच्या निर्णयावर इराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी टीका केली आहे. चर्चेद्वारे प्रामाणिक आणि स्थायी तोडगा काढला जाण्याला इराणची वचनबद्धतता आहे, असे ते म्हणाले आहेत.
दुसरीकडे चौथ्या फेरीमध्ये सहभागी होण्याचे अमेरिकेकडून अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही, असे सूत्रांनी म्हटले आहे. इराणबाबत अमेरिकेने अचानक कठोर भूमिका घेतली आहे. इराणकडून तेल आणि पेट्रोलियम पदार्थांची खरेदी तातडीने थांबवण्यात यावी. इराणकडून जो देश तेलाची खरेदी करेल, तो अमेरिकेशी व्यापार करू शकणार नाही, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हवाई आणि मिशीगनमधील कंपन्यांकडून इराणमधून जिवाश्म इंधन खरेदीचा प्रयत्न केल्याबद्दल संबंधित कंपन्यांविरोधात खटल्याच्या हालचालीही सुरू करण्यात आल्या आहेत. इराणबरोबरच्या या वाटाघाटी अयशस्वी झाल्या तर इराणवर लष्करी कारवाई करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.





