डोनाल्ड ट्रम्पना माजी राजदूतांनी फटकारले ; म्हणाल्या,”चीनला लक्ष्य करा, मित्र भारताला….”

US India Relations। संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या निर्णयावरून चांगलेच फटकारले आहे. त्यांनी स्पष्टपणे इशारा देत अमेरिका-भारत संबंध तुटण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच त्यांनी, “जर अमेरिकेला चीनच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा रोखायच्या असतील तर त्यांना भारतासोबतच्या संबंधांना प्राधान्य द्यावे लागेल” असे स्पष्ट केले आहे.
एका साप्ताहिकात प्रकाशित झालेल्या एका लेखात हेली यांनी यांनी ट्रम्प यांना त्यांच्या निर्णयावरून चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. यात हेली यांनी,”अमेरिकेने आपले लक्ष्य चीन आहे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट दुर्लक्षित करू नये. त्याचा सामना करण्यासाठी अमेरिकेला भारताच्या रूपात एक मित्र असावा” असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
शुल्क आणि रशियन तेलावरील वाद US India Relations।
हेली यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा व्यापार वाद आणि रशियन तेल आयातीवरून अमेरिका आणि भारतामध्ये तणाव वाढला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याबद्दल भारतावर २५% परस्पर शुल्क आणि अतिरिक्त २५% शुल्क लादले आहे, जे २७ ऑगस्टपासून लागू होईल. हेली यांनी कबूल केले की भारताने तेल खरेदी केल्यामुळे रशियाला युक्रेन युद्धासाठी आर्थिक मदत मिळत आहे, परंतु त्याच वेळी त्यांनी इशारा दिला की भारताला शत्रूसारखे वागवणे ही एक धोरणात्मक चूक असेल.
चीनला रोखण्यात भारताची महत्त्वाची भूमिका
लेखात हेली यांनी, “आशियातील चीनच्या वर्चस्वाशी स्पर्धा करणारा भारत हा एकमेव देश आहे. चीनसारख्या मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची क्षमता भारताकडे आहे, ज्यामुळे अमेरिकेला चीनऐवजी भारताद्वारे पुरवठा साखळीची मागणी पूर्ण करण्यास मदत होऊ शकते.” असे त्यांनी म्हटले आहे. त्यासोबतच “अमेरिका आणि इस्रायलसारख्या देशांशी भारताचे मजबूत संरक्षण संबंध जगाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे ठरतात. येणाऱ्या काळात भारत चीनच्या महत्त्वाकांक्षा कमकुवत करेल” असे हेली मानतात.
ट्रम्प-मोदी चर्चेचे आवाहन US India Relations।
हेली यांनी असे सुचवले की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट चर्चा करावी जेणेकरून दोन्ही देशांमधील निर्माण झालेले गैरसमज दूर करता येतील. जर असे झाले नाही तर चीन या दरीचा फायदा घेईल. हेली यांनी त्यांच्या लेखात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी १९८२ मध्ये इंदिरा गांधींना जे म्हटले होते त्याचा उल्लेख केला. त्यांनी लिहिले की अमेरिका आणि भारत कधीकधी वेगवेगळे मार्ग घेऊ शकतात, परंतु त्यांचे गंतव्यस्थान एकच राहिले पाहिजे. चीनच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी अमेरिकेने भारताशी मैत्री राखणे महत्त्वाचे आहे, असा पुनरुच्चार हेली यांनी केला.





