अमेरिका -युरोपीय संघामध्ये व्यापारी करार निश्चित

फ्रँकफर्ट – अमेरिका आणि युरोपीय संघामध्ये व्यापार करार निश्चित झाला आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयन यांनी जाहीर केले आहे. युरोपात उत्पादित होणाऱ्या बहुतेक उत्पादनांवर अमेरिकेत १५ टक्के आयात शुल्क लावले जाणार आहे. ट्रम्प यांनी ३० टक्के आयात शुल्क लावण्याचा इशारा पुर्वी दिला होता. मात्र वाटाघाटींनंतर हे प्रमाण निम्म्याने कमी केले जाऊ शकले.
युरोपातून अमेरिकेत आयात झालेली उत्पादने जेंव्हा अमेरिकेच्या ग्राहकांकडून खरेदी होतील, त्यांना वाढीव आयात शुल्कामुळे वाढलेल्या किंमतींचा भुर्दंड बसणार आहे. पण यामुळे युरोपातल्या कंपन्यांना होणारा फायदा कमी होणार आहे. युरोपात उत्पादन झालेल्या कार, संगणक चिप्स आणि औषधे यासारख्या वस्तूंवर अमेरिकेत १५ टक्के आयात शुल्क लावले जाणार आहे.
याच वस्तूंवर २० टक्के आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव ट्रम्प यांनी आगोदर दिला होता. त्यापेक्षा ठरलेले प्रमाण कमी आहे. ट्रम्प यांनी तर सुरुवातीला ५० टक्के आयात शुल्क लावण्याची धमकी दिली होती. नंतर त्यांनीच हे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत कमी केले होते. सरतेशेवटी १५ टक्क्यांवर तडजोड मान्य करावी लागली.
विमाने आणि विमानांचे भाग, काही रसायने, सेमिकंडक्टर उपकरणे, काही कृषी उत्पादने आणि काही नैसर्गिक संसाधने आणि महत्त्वाचे कच्चा माल.यासारख्या विविध प्रकारच्या धोरणात्मक वस्तूंसाठी दोन्ही बाजूंनी शून्य शुल्क आकारण्यावर सहमती दर्शविली आहे, असे उस्रुला वोन डेरलेयन यांनी सांगितले. मात्र त्यांच्या निवेदनात तपशीलांचा अभाव होता. या यादीमध्ये इतर उत्पादनांचा समावेश करण्यासाठी वाटाघाटी सुरू राहतील, असेही त्या म्हणाल्या.
याशिवाय रशियाकडून इंधन खरेदीला पर्याय म्हणून अमेरिकेकडून ७५० अब्ज डॉलरच्या नैसर्गिक गॅस, तेल आणि आण्विक इंधनाची खरेदीही युरोपाकडून केली जाईल. तसेच अतिरिक्त ६०० अब्ज डॉलरची गुंतवणूक युरोपीय संघाकडून अमेरिकेत केली जाणार आहे.





