अमेरिकेच्या निर्णयाचा आयटी क्षेत्रावर जास्त परिणाम होणार नाही; कंपन्यांचा विश्वास

नवी दिल्ली – अमेरिकेने अचानक एच -1 बी व्हिसाचे शुल्क 5 हजार डॉलरवरून 1 लाख डॉलर केले आहे. मात्र भारतातील बहुतांश कंपन्यांनी परिस्थितीपूर्व खबरदारीची उपाययोजना म्हणून अमेरिकेवरील परावलंबित्व कमी केले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या निर्णयाचा आयटी क्षेत्रावर जास्त परिणाम होणार नाही, असे काही कंपन्यांनी सांगितले आहे.
अमेरिकेला सॉफ्टवेअर निर्यात करणार्या हॅपीएस्ट माईंड कंपनीने सांगितले की, अमेरिकेतील नकारात्मक वातावरण पाहून आम्ही जास्तीत जास्त कर्मचारी भारतात नियुक्त करून त्यांच्यामार्फत माहिती तंत्रज्ञान सेवांची निर्यात करण्याची भूमिका अंमलात आणली आहे. यामुळे किमान आमच्यावर तरी अमेरिकेच्या निर्णयाचा जास्त परिणाम होणार नाही. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व्यंकटरमन नारायणन म्हणाले की, आम्ही शक्यतो परदेशात कर्मचारी नियुक्त करण्याचे टाळत आलेलो आहोत.
ते म्हणाले की, आम्ही गेल्या 14 वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहोत. त्यामुळे आम्हाला जागतिक परिस्थितीचा अंदाज आलेला आहे. त्यामुळे आमचे 94% कर्मचारी भारतात काम करतात. या कंपनीची 43 देशांत कार्यालये असून 6,500 कर्मचारी काम करतात. इतर कंपन्यांनीही अशाच प्रकारचे बिझनेस मॉडेल तयार करण्यावर भर दिला आहे.





