देशात आयटी क्षेत्रात महाराष्ट्रच सुपर ! ३४ पैकी ११ सुपरकॉम्प्युटर्स राज्यात

मुंबई – संपूर्ण एआयची चर्चा करीत असताना भारतातील सुपर कॉम्प्युटर्स चर्चेत आले आहेत. भारतीय आयटी तज्ज्ञांचा जगात दबदबा आहे. डॉ. विजय भटकरनिर्मित परम सुपरकॉम्प्युटरपासून सुरू झालेला प्रवास आता एआयसमृद्ध ऐरावतपर्यंत पोहोचला आहे.
विशेष म्हणजे या क्षेत्रात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करीत असून देशभरातील ३४ सुपरकॉम्प्युटर्सपैकी सर्वाधिक अकरा महासंगणक महाराष्ट्रात आहेत.
केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. या मंत्रालयाने २०१५ साली ४.५ हजार कोटींच्या निधीसह नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन सुरू केले.
यातून ३४ सुपरकॉम्प्युटर्स तयार झाले. ते शैक्षणिक, आयआयटी, आयआयएससी, सीडॅकसारख्या संस्था व प्रयोगशाळांमध्ये बसविण्यात आले. यापैकी सर्वाधिक ११ सुपरकॉम्प्युटर्स महाराष्ट्रात आहेत.
एनएसएमचे उद्दिष्ट होते सुपर कॉम्प्युटिंगमध्ये स्वावलंबन व जागतिक नेतृत्व करणे. यासोबतच सुपरकॉम्प्युटरची रचना, विकास, उत्पादन यावरदेखील विविध प्रयोग सुरू आहेत. देशात आता पूर्णपणे स्वदेशी सुपर कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानाची क्षमता निर्माण झाली आहे.
दरम्यान, स्वदेशी तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेले तीन परम रुद्र सुपरकॉम्प्युटर तयार करण्यात आले असून ते पुणे, दिल्ली व कोलकाता येथे इन्स्टॉल करण्यात आले आहे.





