भारतातील कॉल सेंटरची फसवी योजना अमेरिकेतून बंद

न्यूयॉर्क – अमेरिकेतील व्यक्ती मास्टर माईंड असलेली आणि भारतातील कॉल सेंटरच्या माध्यमातून चालवली जाणारी एक फसवी योजना अमेरिकेतील न्यायालयाने आज कायम स्वरुपी बंद केली. या “टेक्निकल सपोर्ट’ योजनेच्या माध्यमातून अमेरिकेतील शेकडो ज्येष्ठ नागरिक आणि सहज फसवल्या जाऊ शकणाऱ्या नागरिकांची फसवणूक केली गेली होती.
अमेरिकेतील ग्लेन्डाले, कॅलिफोर्निया येथील रहिवासी असलेल्या 59 वर्षीय मायकेल ब्रायन कोटर आणि चार कंपन्या तातडीने बंद करण्याचे आदेश अमेरिकेतील डिस्ट्रीक्ट कोर्टाने दिले आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या न्याय विभागाने दिली आहे. सिंगापूरमध्ये नोंदणी असलेली ग्लोबल डिजिटल कंसीयज, सेन्सी वेंचर्स इन्कॉर्पोरेटेड, एनई लॅब इंक या नेवाडामधील नोंदणी असलेल्या कंपन्या आणि न्यूयॉर्कमध्ये नोंदणी असलेल्या केव्हिसॉफ्ट या कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या कंपन्या टेलिमार्केटिंग अथवा वेबसाईटच्या माध्यमातून टेक्निकल सपोर्ट सर्व्हिस पुरवत असत, असे सिव्हिल विभागासाठी कार्यवाहक सहाय्यक ऍटर्नी जनरल जेफ्री बॉसर्ट क्लार्क म्हणाले.
भारतामध्ये कार्यरत असलेल्या फसव्या कॉलसेंटरविरोधात सीबीआयने कारवाई केल्याबद्दल अमेरिकेच्या न्याय विभागाने सीबीआयला धन्यवाद दिले आहेत.
खोट्या व्हायरसला हटवण्यासाठी बनाव
या प्रकरणी मायकेल ब्रायन कॉटर 2011 पासून भारतातील व्यक्तींबरोबर संगनमत करून फ्रॉड टेक्निकल सपोर्ट कॉल सेंटर चालवत असे. अशी तक्रार यावर्षी ऑक्टोबरमध्ये तक्रार दाखल केली गेली होती. या कॉलसेंटरच्या माध्यमातून अमेरिकेतील ग्राहकांच्या कॉम्प्युटरवर इंटरनेटच्या माध्यमातून बनावट “पॉप अप’ मेसेज पाठवले जात असत. हे मेसेज मायक्रोसॉफ्ट अथवा अन्य प्रसिद्ध कंपन्यांकडून आल्याचे भासवले जात असे.
कॉम्प्युटरमध्ये व्हायरस असून तो हटवण्यासाठी कॉम्प्युटर स्कॅन करणे आवश्यक असल्याचे ग्राहकांना सांगितले जात असे. त्यासाठी टोल फ्री कमांकही उपलब्ध करून दिला जात असे. त्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यावर भारतातील कॉल सेंटरमधून ग्राहकांना खोटी मदत पुरवली जात असे आणि बदल्यात ग्राहकांकडून शेकडो डॉलर उकळले जात असे.





