‘टॅरिफ युद्धामुळे चीनला मोठा धक्का बसला, पुढचा रस्ता सोपा नसेल’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

US China Tariff War । अमेरिकेने लादलेल्या शुल्काबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याच लोकांना इशारा दिला आहे. भविष्यात अमेरिकेतील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच “आपण आधी खूप असहाय्य होतो, पण आता असे होणार नाही.’ असे म्हणत त्यांनी अमेरिकन नागरिकांना विश्वास दिला. यावेळी ट्रम्प यांनी ‘हे सोपे नसेल, परंतु अंतिम निकाल ऐतिहासिक असेल. “असेही सांगितले .
‘अमेरिकेपेक्षा चीनचे जास्त नुकसान झाले’ US China Tariff War ।
डोनाल्ड ट्रम्प यांची ही टिप्पणी अशा वेळी आली आहे जेव्हा अमेरिकेने लादलेल्या टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकन उत्पादनांवर ३४ टक्के कर लादला आहे. १० एप्रिलपासून अमेरिकन वस्तूंवर हे शुल्क लागू केले जाईल. याशिवाय चीनने १६ अमेरिकन कंपन्यांवरही कारवाई केली आहे. यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “अमेरिकेपेक्षा चीनचे जास्त नुकसान झाले आहे. चीनसोबतच इतर अनेक देशांनी आपल्याशी खूप वाईट वागणूक दिली आहे.
अमेरिका आर्थिक क्रांती जिंकेल US China Tariff War ।
ट्रम्प म्हणाले, “अमेरिकेत पाच ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक आधीच आली आहे आणि ती वेगाने वाढत आहे. ही एक आर्थिक क्रांती आहे आणि आपण जिंकू. आपण अमेरिकेला पुन्हा महान बनवू.” अमेरिकेने व्यापारी भागीदार देशांवर प्रत्युत्तरात्मक शुल्क लादल्यानंतर चीनने जागतिक व्यापार संघटनेकडे (WTO) तक्रार दाखल केली आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की, चीनने १६ अमेरिकन कंपन्यांना दुहेरी वापराच्या वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिका-चीन व्यापार
एका वृत्तसंसंस्थेनुसार, चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे की अमेरिकन संस्था अशा कारवायांमध्ये सहभागी आहेत ज्यामुळे चीनची राष्ट्रीय सुरक्षा आणि हितसंबंध धोक्यात येऊ शकतात. अमेरिकन व्यापार प्रतिनिधी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये अमेरिकेचा चीनसोबतचा एकूण व्यापार ५८२.४ अब्ज डॉलर्स इतका होता. गेल्या वर्षी, अमेरिकेने चीनला एकूण १४३.५ अब्ज डॉलर्सच्या मालाची निर्यात केली, तर आयात ४३८.९ अब्ज डॉलर्सची झाली. या काळात, अमेरिकेची चीनसोबतची व्यापार तूट $२९५.४ अब्ज होती.





