ड्रग तस्करांच्या ३ बोटींवर अमेरिकेचा हल्ला; १४ जण ठार

वॉशिंग्टन – पूर्व प्रशांत महासागरामध्ये ड्रग्जची तस्करी करण्याचा संशय असलेल्या ३ बोटींवर अमेरिकेने हल्ला केला असून या हल्ल्यात १४ जण ठार झाले आहेत. या बोटींवरील एकच व्यक्ती जिवंत वाचू शकला आहे. सामवारी केलेल्या या कारवाईची माहिती अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी दिली आहे. सोशल मीडियावर या कारवाईची माहिती देण्यात आली.
मात्र या कारवाईमुळे पार्देशिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सप्टेंबर महिन्यापासून अमेरिकेकडून प्रशांत महासागरातील अशा संशयित बोटींवर हवाई हल्ले केले जात आहेत. व्हेनेझुएलाच्या ३ बोटींवर आतापर्यंत अमेरिकेने हवाई हल्ले केले असून त्यात ४२ खलाशी ठार झाले आहेत.
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेच्या हल्ल्यांनाचोख प्रत्युत्तर देण्याचा इशाराही दिला आहे. ड्रग्जच्या तस्करीमध्ये सहभागी असल्याचा आरोप करून अमेरिकेने कोलंबियाच्या अध्यक्षांसह त्यांच्या कुटुंबियांवरही निर्बंध घातले आहेत. तेंव्हापासून पूर्व प्रशांत क्षेत्रात अस्थिरता निर्माण झाली आहे.
एकाच दिवसात अनेक बोटींवर हवाई हल्ले करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ होती. ऑक्टोबरच्या सुरुवातीला झालेल्या हल्ल्यात दोन जण वाचले होते, परंतु अमेरिकन सैन्याने या जोडप्याला वाचवले आणि नंतर त्यांना कोलंबिया आणि इक्वेडोरला परत पाठवले.





