कैरो – अमेरिकन सैन्याने येमेनची राजधानी सना आणि हौथींच्या ताब्यातील होदेइदा या किनारी शहरावर हवाई हल्ले केले. दोनच दिवसांपुर्वी अमेरिकेच्या हल्ल्यात लाल समुद्रातील रास इसा हे बंदर उद्ध्वस्त झाले आणि ७० हून अधिक लोक ठार झाले होते. आज करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात किती जण ठार झाले, हे समजू शकले नाही. येमेनमधील हौथी बंडखोरांविरुद्ध हल्ले सुरूच आहेत, असे मध्य पूर्वेतील अमेरिकन लष्करी कारवायांवर देखरेख करणाऱ्या अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने म्हटले आहे. गुरुवारी येमेनमधील होदेइदा प्रांतातील रास इसा बंदरावर अमेरिकेचा भीषण हवाई हल्ला झाला होता. त्यामध्ये ७४ लोक ठार आणि १७१ जण जखमी झाले होते, असे हौथींच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. इराणचा पाठइंबा असलेल्या बंडखोरांवर अमेरिकेने सुरू केलेल्या बॉम्बहल्ल्याच्या मोहिमेतील हा सर्वात प्राणघातक हल्ला होता. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टोनिओ गुटेरेस यांनी रास इसा बंदरावरील हल्ल्याबद्दल तसेच हौथींकडून इस्रायलवर आणि सागरी मार्गांवर व्यापारी जहाजांवर केल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेने १६ मार्चपासून सुरू केलेल्या हौथींविरोधातल्या मोहिमेत आतापर्यंत सुमारे २०० लोक मारले गेले आहेत, असे हौथींच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.