Uruli Kanchan | ’डीजे’चा दणदणाट थांबणार की वाजणार? ;

प्रभात वृत्तसेवा
उरुळी कांचन – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शांतता झोनमध्ये 40 ते 50 डेसिबल, निवासी भागात 45 ते 55 डेसिबल, व्यापारी झोनमध्ये 55 ते 65 डेसिबल आणि औद्योगिक क्षेत्रात 70 ते 75 डेसिबलपर्यंत आवाज बंधनकारक आहे; मात्र उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या आगमानादिवशी पोलिसांसह अनेकांनी कानात बोटे, बोळे घातले होते.
निवासी इमारती, रुग्णालये, शाळा आहेत, तरीदेखील मिरवणुकांमधील आवाज मर्यादेत नसतोच. पण, कोणाच्या भावना दुखावू नयेत म्हणून पोलिस मंडळाच्या पदाधिकार्यांना केवळ आवाज मर्यादेत असावा, डीजे लावू नका, इतरांच्या धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य नको, मिरवणूक एकाच ठिकाणी खूपवेळ रेंगाळत ठेवू नये, अशा सूचना देतात; पण त्याचेही पालन होत नाही.
त्यामुळे उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘डीजे’चा दणदणाट यावर्षी थांबणार का, असा प्रश्न उरुळी कांचनकर विचारत आहेत.डीजेच्या होणार्या त्रासाची सर्वांनाच कल्पना आहे. लहान मुले, गर्भवती स्त्रिया, आजारी व वृद्ध नागरिकांना त्याचा सवाधिक फटका बसण्याची शक्यता असते, याचा विचार करून शासन व न्यायालय या दोन्हीही पातळीवर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या ध्वनिक्षेपकाच्या आवाजावर मर्यादा घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट डीजेला परवानगी नाकारली आहे. तर ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंडळांना कर्णकर्कश आवाजाला परवानगी देण्यात आलेली नाही.
आगामी काळात निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणूकपूर्वीचा गणेशोत्सव असल्यामुळे यंदाही मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कार्यकत्यांच्या मर्जी जपण्यासाठी अनेक मंडळांकडून ध्वनिक्षेपक वापराबाबत नियोजन केले आहे. परंतु एकंदर उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पारंपरिक वाद्यांवर भर देणे आवश्यक आहे.
एक बेस, एक टॉपलाच परवानगी..
या वर्षी गणेशोत्सवात डीजेला परवानगी नाकारण्यात आली असली तरी उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंडळाकडून पैसे भरून डीजे बुक केले आहेत. अशी माहिती एका मंडळाच्या अध्यक्षाने दिली आहे. गणेशोत्सवात बिनधास्तपणे ‘डीजे’ लावले जातात. मिरवणुकांमध्ये आवाजाचा दणदणाट अर्धा, एक किलोमीटरपर्यंत ऐकू येतो.
आवाज मोजमापासाठी पोलिसांकडे मशिन असतात, पण गुन्हा कोणावरच दाखल होत नाही. पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी मंडळाच्या अध्यक्षाकडून तसेच कार्यकर्त्यांकडून चिरीमिरी घेऊन डीजेच्या दणदणाटाला परवानगी देत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.
“उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपती मंडळाची बैठक नुकतीच पोलीस ठाण्याच्या आवारात पार पडली. यामध्ये मंडळांच्या अध्यक्षांना सूचना देण्यात आल्या आहेत. ध्वनीप्रदूषण कायद्यांतर्गत उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळावर, तसेच डीजेचालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पारंपारिक वाद्याला प्राधान्य देण्यात यावे.”
-शंकर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरुळी कांचन





