Uruli Kanchan | “उरुळी कांचनने नेहमीच मजबूत नेतृत्व दिलं” – शरद पवार

प्रभात वृत्तसेवा
उरुळी कांचन – देशाच्या व राज्याच्या घडणीत उरुळी कांचन गावाने अनेक चांगले नेते व कार्यकर्ते दिले आहेत. राजकीय, सहकार व साहित्यिक या ठिकाणी घडून त्यांनी देशात काम केले आहे. आपल्या नेत्यामागे कसे भक्कम उभे रहावे असे कार्यकर्ते या ठिकाणी घडले आहेत. तसेच उरुळी कांचन ग्रामपंचायतीने वैभवास साजेशी अशी इमारत बांधल्याने पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक वाटते, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री मंत्री शरद पवार यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे नव्याने बांधलेल्या नविन ग्रामसचिवालयाच्या वास्तूचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते रविवारी (दि. 31) केले. त्यावेळी पवार बोलत होते.यावेळी माजी आमदार अशोक पवार, रमेश थोरात, जगन्नाथ शेवाळे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, गटविकास अधिकारी एस. एम. शेलार, उरुळी कांचनच्या सरपंच ऋतुजा कांचन, उरुळी कांचनचे ज्येष्ठ नेते के.डी. कांचन, पुणे बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, संचालक राजाराम कांचन, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदिप भोंडवे,
यशवंत कारखान्याचे संचालक संतोष कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेवराव कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, उरुळी कांचन येथील व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष संजय कांचन, बहुजन आधार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय दिक्षित, दत्तात्रय कांचन, भाऊसाहेब कांचन, अमित कांचन, मयूर कांचन, उपसरपंच स्वप्नीशा कांचन, युवा नेते अजिंक्य कांचन, ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश गळवे ग्रामस्थ उपस्थित होते.
पवार म्हणाले, “आजही या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावे असे नेतृत्व या गावाने दिले आहेत. डॉ. मणिभाई देसाई यांनी हरित व दूधक्रांती येथून जगभरात पोहचविले आहे. जिल्ह्यात अलिकडे औद्योगिकीकरण होत असताना जिल्ह्यातील पुरंदर विमानतळ असो की अन्य प्रकल्प या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी पुढील 25 ते 30 वर्षाचा वेध घेऊन काम केले पाहिजे. तसेच उरुळी कांचनच्या शिक्षण संस्थेतून मी काम करीत असल्याने शिक्षणाच्या अनेक बाबी पूर्ण झाल्या आहेत. अनेक उद्योगपती पुढे आल्याने मोठे काम होऊ शकले.”
आमदार ज्ञानेश्वर कटके म्हणाले, ” राज्य सरकाने लोणी काळभोरपर्यंत मेट्रो मंजूर केली आहे. केंद्र सरकारकडून नुकतीच नव्याने रेल्वेचे टर्मिनल उरुळी कांचन येथे होणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. उन्नत मार्गातून मेट्रो उरुळी कांचन पर्यंत आणण्याचा प्रयत्न आहे. सोलापूर रोड व नगर रोडला उन्नत मार्गातून इलिव्हेटेड मार्गांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे भविष्यात वाहतुकीची अडचण सुटणार आहे. नर्सरी उद्योगाला विमानतळाशी जोड देऊन हॉर्टीकल्चर हब म्हणून मान्यता देऊन स्थानिकांना रोजगार देऊन व्यावसायिकांच्या मालाला जगभर पसंती देण्याचा मानस आहे.
यवत- हडपसर प्रकल्पात राज्य सरकार घुसले..
खासदार अमोल कोल्हे म्हणाले, शिरूर-हवेलीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार काही धोरणात्मक निर्णय घेत आहे. त्याला आम्ही जरी सत्तेत नसलो तरी चांगल्या प्रकल्पांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहोत. यवत ते हडपसर इलिव्हेटेड मार्गाचे काम हे केंद्राचे असून राज्य सरकार आता या प्रकल्पात घुसले आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
एमएसआरडीसीच्या डीपीआरमध्ये काही एक्सिट मार्ग काढले असून त्यात बदल करण्यास अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर पुणे-सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. उरुळी कांचनच्या सर्वानी मिळून देखणी इमारत उभी केल्याबद्दल सर्वांचे मनापासून कौतुक करतो.
सरपंचांना खुर्चीत बसवून दिले आदराचे स्थान..
ग्रामविकासलयाचे उद्घाटन करताना शरद पवार यांनी नवीन प्रशस्त कार्यालयाची पाहणी केली. या दरम्यान पवार यांनी सरपंच कक्षाला भेट देऊन आदराने सरपंच ऋतुजा कांचन यांना आसनाधिस्त केले. कामकाजात पुरुषांना हस्तक्षेप करु देऊ नका, अशीही मिश्कीली मारली.
“महात्मा गांधी सर्वोदय संघाच्या शैक्षणिक संकुल व शैक्षणिक सुविधांना भरीव असा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल पवार साहेबांचे आभार माणून भविष्यात या भागाच्या अधिक शैक्षणिक सुविधांसाठी आपला आधार कायम रहावा.”
– ऋतुजा कांचन,(सरपंच, उरुळी कांचन, ता. हवेली)





