Uruli Kanchan Police : उरुळी कांचन पोलिसांना 13 बळी गेल्यानंतर जाग; शिंदवणे अन् भवरापुरात हातभट्ट्यांवर छापे
Uruli Kanchan Police : पुण्यातील विषारी दारू प्रकरणात १३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला आली जाग; उरुळी कांचन पोलिसांची बेकायदेशीर अड्ड्यांवर धाड.

Uruli Kanchan Police – पुण्यात विषारी दारू प्रकरणात 13 जणांचा मृत्यू झाल्यानंतर उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. शिंदवणे आणि भवरापूर परिसरात करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण 1 लाख 12 हजार रुपयांहून अधिक किमतीचे रसायन, गावठी दारू आणि साहित्य जप्त करण्यात आले.
पहिली कारवाई शुक्रवारी (दि. 29) सकाळी सुमारे सव्वा अकराच्या दरम्यान शिंदवणे गावच्या हद्दीतील काळेशिवार, कंजारभट वस्ती येथे करण्यात आली. या कारवाईदरम्यान तमन्ना सनी चव्हाण (वय 20, रा. शिंदवणे) ही महिला गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच ती घटनास्थळावरून पसार झाली.
पोलिसांनी घटनास्थळावरून 500 लिटर कच्चे रसायन, 250 लिटर जळके रसायन, 20 लिटर तयार गावठी दारू तसेच इतर साहित्य असा एकूण 40 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पहिल्या कारवाईनंतर अवघ्या 15 मिनिटांत भवरापूर गावच्या हद्दीत ओढ्यालगत दुसरी धाड टाकण्यात आली. पोलीस हवालदार कमलेष होले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या वेळी परलोक अशोक रजपूत (रा. दत्तवाडी, उरुळी कांचन) हा इसम गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि रसायनांसह मिळून आला. पोलिसांना पाहताच त्यानेही घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी येथून सुमारे 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये फरार आरोपी तमन्ना चव्हाण आणि परलोक रजपूत यांच्याविरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.





