प्रभात वृत्तसेवा उरुळी कांचन – येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढले आहे. महिलांना एकटे गाठून चोर महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून नेण्याच्या घटना वारंवार घडत असूनदेखील पोलीस कुठलीच कारवाई करताना दिसत नाहीत.उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी भर वर्दळीत असलेल्या महात्मा गांधी रस्त्यावरील श्रीकृष्ण मंदिर परिसरात व इरिगेशन कॉलनी परिसरात पायी चालत निघालेल्या महिलांच्या गळ्यातील सोन साखळी धूम स्टाइलने दोन चोरट्यांनी लंपास केली. उरुळी कांचन पोलिसांच्या दुर्लक्षामुळे व पोलिसांची गस्त नावालाच असल्याने महिलांची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या तपास पथकाकडून व स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पोलिसांना अद्याप उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी, चोरी, व सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात अपयश आले आहे. पूर्व हवेलीतील उरुळी कांचन गाव अतिसंवेदनशील असल्याने या ठिकाणी काम करणारे पोलीस अधिकारीपण त्याच जोमाचे व ताकदीचे असतील, तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही; परंतु मागील काही दिवसांपासून या ठिकाणी येणारे अधिकारी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यापेक्षा इतर गोष्टींना जास्तच प्राधान्य देत असल्याने ‘खाकी वर्दीची झाकी’ दुर्मिळ होत चालली असल्याची चर्चा दबक्या आवाजात जोरदार सुरु झाली आहे. दरम्यान, या टोळ्या आता पोलिसांच्या रडारवर आल्या असून, पोलीस त्यांच्या मागावर आहे. मात्र, असे असताना देखील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनसाखळी चोरीचे सत्र थांबलेले नाही. जिल्ह्यातील एक नंबरची पोलीस यंत्रणा असणार्या पोलिसांपुढे सोनसाखळी चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आहे. “उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा व रात्री वारंवार गस्त सुरु आहेत. सोनसाखळी चोरी झालेल्या घटना खर्या आहेत, मात्र पोलीस ठाण्यात कोणीही तक्रार दिलेली नाही. वारंवार गस्त घालीत असल्याने गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. लवकरच चोरांच्या मुसक्या आवळू, त्यासाठी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.” -शंकर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरुळी कांचन पोलीस ठाणे