Kalas Theft Incident : कळस परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत मोटारसायकल, सोन्याचे गंठण लंपास
Kalas Theft Incident : महिनाभरापूर्वी घेतलेली नवीन मोटारसायकल चोरली, तर झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील गंठण कापले; कळस परिसरात चोरट्यांच्या टोळीचा थरार.

Kalas Theft Incident – इंदापूर तालुक्यातील कळस परिसरात गेल्या चार दिवसांत चोरीच्या दोन मोठ्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी दुकाने फोडून रोकड, महागड्या वस्तू, मोटारसायकल आणि महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण असा मुद्देमाल लंपास केला आहे. पोलीस यंत्रणेने या टोळीचा तातडीने छडा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
पहिली घटना मध्यरात्री घडली असून चोरट्यांनी विशाल खारतोडे यांच्या ‘श्रीराम हार्डवेअर’चे छताचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील ३० हजार रुपये किमतीचे कॉपर वायर बंडल, २० हजारांचे स्टार्टर, ७ हजारांचा विद्युत पंप आणि ७ हजारांची रोकड असा मुद्देमाल चोरला. त्यानंतर लगतच्या ‘श्रीराम गिफ्ट शॉपी’चे शटर उचकटून ३० हजारांची रोकड आणि ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचा मुलामा असलेले दागिने लंपास केले.
पुरावा नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी दोन्ही दुकानांतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर (DVR) आणि बाहेरील कॅमेऱ्यांच्या केबलही सोबत नेल्या आहेत. पहिली घटना ताजी असतानाच, मंगळवारी (दि. २४) मध्यरात्री चोरट्यांनी महेश सोपान गाढवे यांनी महिनाभरापूर्वीच १ लाख ४० हजार रुपयांना खरेदी केलेली ‘युनिकॉर्न’ मोटारसायकल घराबाहेरून चोरली.
त्यांचे वडील खाटेवर जवळच झोपलेले असताना चोरट्यांनी ही चोरी केली. त्यानंतर चोरट्यांनी लक्ष्मण गाढवे यांच्या ‘स्प्लेंडर’ मोटारसायकलमधील ७ लिटर पेट्रोलही काढून घेतले. ही सर्व दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. भिगवण रस्त्यालगत असलेल्या वायाळवस्तीवर घराबाहेर झोपलेल्या साळूबाई संजय वायाळ यांच्या गळ्यातील सुमारे १ तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी कापून नेले.
गळ्यातून गंठण काढताना साळूबाईंना जाग आली आणि त्यांनी आरडाओरड केली. त्यांचे पती संजय वायाळ जागे होईपर्यंत चोरटा मोटारसायकलवरून पसार झाला. पाठीवर सॅक, तोंडाला मास्क आणि हातात मोबाईल असलेले हे चोरटे भिगवणच्या दिशेने गेल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
‘ग्रामसुरक्षा यंत्रणा’ धूळ खात!
आपत्कालीन काळात ग्रामस्थांना सतर्क करणारी ‘ग्रामसुरक्षा यंत्रणा’ कळसमध्ये गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. खर्चाअभावी ग्रामपंचायतीने ही यंत्रणा बंद ठेवल्याने चोरीच्या घटनांवेळी ग्रामस्थांना सतर्क करणे कठीण झाले आहे. वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर ही यंत्रणा तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.





