Uruli Kanchan Accident : रेल्वेच्या धडकेत वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू ; गावात शोककळा

प्रभात वृत्तसेवा
उरुळी कांचन – पुणे – दौंड लोहमार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील नऊ मोरी परिसरात अज्ञात रेल्वे गाडीने दिलेल्या धडकेत उरुळी कांचन येथील महिलेचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (दि. 24) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हिराबाई प्रतापराव फडतरे (वय -75, रा. महादेवनगर, उरुळी कांचन, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.हिराबाई फडतरे या मागील अनेक दिवसांपासून आजारी होत्या. आजारपणामुळे त्यांना काही सुचत नव्हते. त्यामुळे घरातून बाहेर गेल्यानंतर माघारी येता येत नव्हते. त्यामुळे त्यांना शोधून घरी आणावे लागत होते. नेहमीप्रमाणे फडतरे या घरातून बाहेर गेल्या.
मात्र, घरी परत आल्या नाहीत. त्यांची शोधाशोध केली असता मिळून आल्या नाहीत. यावेळी उरुळी कांचन रेल्वे स्थानक येथील नऊ मोरी परिसरात एका रेल्वेच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती नागरिकांना मिळाली. त्याठिकाणी पाहणी केली असता फडतरे याच असल्याचे निदर्शनास आले. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान, घटनेची नोंद रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी करून पुढील कार्यवाही केली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.





