Uruli Kanchan Accident : पुणे-सोलापूर हायवेवर मृत्यूचा थरार! विरूद्ध दिशेने येणार्या टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
Uruli Kanchan Accident : कोरेगाव भीमा येथील टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल; डोक्याला गंभीर दुखापत आणि अतिरक्तस्त्रावामुळे पादचाऱ्याचा बळी.

Uruli Kanchan Accident – पुणे-सोलापूर महामार्गावर विरुद्ध दिशेने येणार्या टेम्पोने दिलेल्या धडकेत उरुळी कांचन येथील एका वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी तळवाडी चौक परिसरात घडली. अर्जुन गंगाराम बोराटे (रा. तळवाडी चौक, उरुळी कांचन, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी तुषार सुनील बोराटे (वय 31) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अमोल सोमेश्वर गवई (वय 30, रा. डेरंगे वस्ती, कोरेगाव भीमा, ता. शिरूर) या टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार बोराटे यांचे तळवाडी चौकात ‘सावता माळी स्नॅक्स’ हे हॉटेल आहे. गुरुवारी सकाळी सुमारे सहा वाजता त्यांचे आजोबा अर्जुन बोराटे हे हायवेच्या कडेला पायी चालत होते. त्यावेळी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने विरुद्ध बाजूने येणारी अशोक लेलँड कंपनीची ‘दोस्त’ (एमएच 12 व्हीटी 3407) ही गाडी भरधाव वेगात आली.
चालक अमोल गवई याने निष्काळजीपणे वाहन चालवत बोराटे यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून नाक, कान व तोंडातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. अपघातानंतर जखमी बोराटे यांना तात्काळ उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि. 24) दुपारी त्यांचा मृत्यू झाला.





