Leopard attack : शेतात अचानक बिबट्याचा हल्ला; शेतकरी थोडक्यात बचावला, पाठीवर नखांचे ओरखडे
Leopard attack : फुरसुंगीतील झेंडेवस्ती येथे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. नागरिक धावून आल्याने शेतकरी थोडक्यात बचावला.

Leopard attack : फुरसुंगी – शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर झडप घातल्याची थरारक घटना फुरसुंगी परिसरातील वडकीनाला-गायदरा येथील झेंडेवस्ती येथे शनिवारी सकाळी घडली. या हल्ल्यात हनुमंत सुरेश झेंडे यांच्या पाठीवर बिबट्याच्या नखांचे ओरखडे पडले असून, नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला.
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत झेंडे हे शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास नेहमीप्रमाणे शेतात काम करत होते. यावेळी शेत परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याने हल्ला केल्याने झेंडे यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
त्यांचा आवाज ऐकून शेजारील नागरिक तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धावले. नागरिकांची चाहूल लागताच बिबट्याने तेथून पळ काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या हल्ल्यात झेंडे यांच्या पाठीवर बिबट्याच्या नखांचे ओरखडे पडले आहेत.
दरम्यान, झेंडेवस्ती परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दोन बिबट्यांचा वावर असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेत परिसरात बिबट्याचा वारंवार वावर होत असल्याने वन विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.





