Pimple Saudagar : पिंपळे सौदागरमधील धोकादायक खड्ड्याची तातडीने दुरुस्ती
Pimple Saudagar : प्रभातच्या वृत्ताची दखल; बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाची हालचाल

Pimple Saudagar : पिंपळे सौदागर परिसरातील काँक्रिट रस्त्यावर पडलेल्या धोकादायक खड्ड्याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित हा प्रश्न अधोरेखित झाल्यानंतर संबंधित विभागाने घटनास्थळी पाहणी करून दुरुस्तीची कामे हाती घेतली.
रस्त्यावरील खड्डा आणि त्याच्या आसपासचा खचलेला भाग सिमेंट व खडीच्या साहाय्याने भरून मुख्य रस्त्याच्या पातळीशी समतल करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित झाली असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.
विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका होता. प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. वृत्तपत्रात प्रश्न मांडल्यानंतर प्रशासनाने तत्परता दाखवल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
तसेच लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडल्याबद्दल ‘प्रभात’चे आणि त्वरित दखल घेतल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले आहेत. नागरिकांच्या समस्यांवर तत्काळ उपाययोजना होणे ही सकारात्मक बाब असल्याची प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे.




