‘उर्फी जावेद’ला अटक होणार? चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस

मुंबई – अभिनेत्री, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये काम करणारी अभिनेत्री ‘उर्फी जावेद’ ही तिच्या हटके फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी ही अतरंगी लूक करुन फोटोशूट करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. अनेक लोक उर्फीला त्यामुळे ट्रोल करतात तर काही जण तिचं कौतुक करतात. गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात सुरु असलेला वाद अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. हा वाद एवढ्यातच थंडावेल असं वाटत नाही.
चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत उर्फी विरोधात तक्रार दाखल केली होती. ‘उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा’ अशी मागणी यावेळी त्यांनी पोलिसांकडे केली. या संदर्भातील एक पोस्ट देखील त्यांनी आपल्या अधिकृत ट्विट आकाउंटवर शेअर केली आहे.
दरम्यान, आता चित्रा वाघ यांच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन करण्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस धाडली असून, तिला पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितलं आहे. मुंबईच्या जोगेश्वरी याठिकाणी असणाऱ्या अंबोली पोलिसांकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
त्यामुळे उर्फीला 14 जानेवारी 2023 रोजी पोलीस ठाण्यात हजर राहावे लागेल. यावेळी तिची चौकशी देखील होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणाती चौकशी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, आता चौकशीसाठी बोलावल्यानंतर उर्फीला मुंबई पोलीस अटक करणार का? असा सवालही यानंतर उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या प्रकरणाला आणखी कोणते नवीन वळण मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





