Jaish-e-Mohammed – पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनांनी आता आपला विस्तार करण्यासाठी नवनव्या संकल्पाना अंमलात आणत आहे. त्यासाठी त्यांनी आता महिला नेटवर्कचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. आयसिस, बोको हराम आणि हमासच्या धर्तीवर या संघटना आता महिला आत्मघाती हल्लेखोरांना प्रशिक्षित करत असल्याची माहिती गुप्तचर अहवालातून समोर आली आहे. विशेषतः सुशिक्षित आणि शहरी मुस्लिम महिलांना कट्टरपंथी विचारधारेकडे आकर्षित करण्यासाठी या संघटना प्रयत्नशील आहेत. जैशने गेल्या वर्षी जमात-उल-मुमिनात या पहिल्या महिला विंगची स्थापना केली होती. आता लष्कर-ए-तोयबा देखील त्याच मार्गावर असून, तैयबत नावाच्या महिला विंगच्या माध्यमातून आपला प्रभाव वाढवत आहे. 9 फेब्रुवारी रोजी लाहोरमध्ये झालेल्या एका सभेत जिहादचे उदात्तीकरण करण्यात आले, ज्यामध्ये लष्करच्या अनेक कमांडरच्या पत्नींचाही सहभाग होता. धार्मिक भावनांना हात घालून या महिलांना कट्टरपंथी बनवले जात आहे. त्यांचा वापर पुढे सुसाईट बॉम्बर म्हणून केला जाणार आहे. मुंबईवरील २६/११ चा हल्ला आणि पुलवामा हल्ल्यासारख्या भीषण घटनांमागे या संघटनांचा हात होता. आता महिलांना समोर करून हे गट नवीन प्रकारचे युद्ध तंत्र विकसित करत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या मॉनिटरिंग रिपोर्टने या बदलाची गंभीर दखल घेतली असून, दक्षिण आशियातील सुरक्षा व्यवस्थेसाठी हे एक मोठे आव्हान असल्याचे म्हटले आहे. महिला बाॅम्बरचा धोका मोठा महिलांना कट्टरपंथी बनवणे म्हणजे संपूर्ण कुटुंबात टोकाचे विचार पेरणे होय. महिलांचा वापर रसद पुरवण्यासाठी, विचारधारेचा प्रसार करण्यासाठी आणि नवीन भरती करण्यासाठी केला जात आहे. जैशने 2001 चा संसद हल्ला आणि 2019 चा पुलवामा हल्ला घडवून आणला होता. त्यामुळे या नव्या महिला नेटवर्कमुळे भारताच्या सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. या महिला नेटवर्कचे मुख्य काम म्हणजे दहशतवाद्यांना रसद पुरवणे, समाजाशी संपर्क वाढवणे आणि नवीन तरुणांना जिहादसाठी तयार करणे हे आहे. कट्टरपंथी विचारधारेच्या प्रचारात महिलांचा सहभाग वाढल्याने अशा नेटवर्कचा शोध घेणे अत्यंत कठीण झाले आहे. याशिवाय या महिला हनी ट्रॅपचे जाळेही पसरवू शकतात. हे देखील वाचा.. Elephant Stampede : हजारीबागमध्ये हत्तींचा धुमाकूळ सुरुच; दोघांचा मृत्यू, आठ जण जखमी