UPSC चेअरमन मनोज सोनी यांचा राजीनामा, कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच ‘पद’ सोडले नेमकं कारण काय ?

UPSC Chairman Manoj Soni । केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिला आहे. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनी यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी राजीनामा दिला. सध्या तरी त्यांचा राजीनामा स्वीकारल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मनोज सोनी यांचा कार्यकाळ 2029 मध्ये संपणार होता, त्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला होता. सोनी 2017 मध्ये UPSC सदस्य म्हणून रुजू झाले. 16 मे 2023 रोजी त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बनवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज सोनी यांना गुजरातमधील स्वामिनारायण पंथाची शाखा असलेल्या अनुपम मिशनसाठी अधिक वेळ द्यायचा आहे.
UPSC Chairman Manoj Soni । वैयक्तिक कारणामुळे सोनी यांनी राजीनामा दिला
2020 मध्ये दीक्षा घेतल्यानंतर, ते मिशनमध्ये साधू किंवा निष्काम कर्मयोगी बनले. मनोज सोनी यांच्या राजीनाम्याचा मुद्दा आयएएस पूजा खेडकर यांच्याशी संबंधित नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तीनवेळा कुलगुरू राहिलेल्या डॉ. सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आहे. 2005 मध्ये ते देशातील सर्वात तरुण विद्यापीठाचे कुलगुरू बनले.
UPSC Chairman Manoj Soni । वयाच्या ४० व्या वर्षी कुलगुरूपदी नियुक्ती
मनोज सोनी हे पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय मानले जातात. मोदींनी 2005 मध्ये सोनी यांची वडोदराच्या एमएस युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली होती, असेही सांगितले जाते. नियुक्तीवेळी सोनी यांचे वय अवघे ४० वर्षे होते. केंद्रीय लोकसेवा आयोगात रुजू होण्यापूर्वी सोनी यांनी गुजरातमधील दोन विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून तीन वेळा काम केले.
हे वाचले का ? ‘लहापणी अगरबत्ती विकणारा मुलगा ते यूपीएससी अध्यक्षपद’ जाणून घ्या मनोज सोनी यांच्या संघर्षाची कहानी





