UPI service down : 4 सप्टेंबरला UPI बंद राहणार.! ‘या’ बड्या बँकेकडून तातडीचा संदेश; ग्राहकांवर होणार मोठा परिणाम
UPIच्या माध्यमातून एका दिवसात साधारण 1 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येतात. P2P म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवण्याच्या व्यवहारांसाठी दररोज 20 व्यवहारांची मर्यादा आहे.

UPI service down : भारतात डिजिटल पेमेंटचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी चहाच्या टपरीपासून ते मोठ्या शॉपिंग मॉलपर्यंत, काही सेकंदांत पैसे पाठवण्यासाठी आज लाखो-करोडो लोक UPI चा वापर करतात.
त्यामुळे UPI सेवा काही काळासाठी जरी बंद राहिली, तरी अनेक ग्राहकांची गैरसोय होऊ शकते. अशातच देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या SBIच्या UPI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
जर तुम्ही SBIच्या UPI सेवेद्वारे नियमितपणे पैसे पाठवत असाल किंवा ऑनलाइन पेमेंट करत असाल, तर 4 सप्टेंबरच्या रात्री तुम्हाला काही काळ UPI वापरता येणार नाही.
बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे 4 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 12.15 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत SBIची UPI सेवा उपलब्ध राहणार नाही. म्हणजेच साधारण 45 मिनिटे UPI व्यवहारांवर परिणाम होणार आहे.
UPI बंद असताना ‘हा’ पर्याय ठरणार उपयोगी :
UPI सेवा उपलब्ध नसली तरी छोट्या व्यवहारांसाठी ग्राहकांकडे UPI Lite हा पर्याय उपलब्ध असणार आहे. UPI Liteच्या माध्यमातून छोट्या रकमेचे व्यवहार करता येतात आणि प्रत्येक व्यवहारासाठी UPI PIN टाकण्याची आवश्यकता नसते.
म्हणूनच 4 सप्टेंबरच्या रात्री छोट्या रकमेचं पेमेंट करायचं असल्यास ग्राहकांसाठी UPI Lite उपयोगी ठरू शकते. मात्र, मोठ्या रकमेचे किंवा नेहमीचे UPI व्यवहार करायचे असल्यास सेवा पूर्ववत होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.
UPI व्यवहारांची मर्यादा किती?
UPIच्या माध्यमातून एका दिवसात साधारण 1 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येतात. P2P म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवण्याच्या व्यवहारांसाठी दररोज 20 व्यवहारांची मर्यादा आहे.
मात्र, काही व्हेरिफाइड मर्चंट कॅटेगरीमध्ये यापेक्षा अधिक व्यवहार मर्यादा उपलब्ध आहे. इन्शुरन्स आणि कॅपिटल मार्केटशी संबंधित व्यवहारांसाठी ही मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत, तर IPO, टॅक्स पेमेंट, हॉस्पिटल तसेच शाळा-कॉलेजच्या शुल्कासाठी 5 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
UPIवर MDR लागू होणार?
दरम्यान, UPI वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आणखी एक महत्त्वाची चर्चा सुरू आहे. सरकारकडून काही निवडक मर्चंट व्यवहारांवर MDR म्हणजेच Merchant Discount Rate लागू करण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
मात्र, MDRचा दर किती असेल, कोणत्या व्यवहारांवर तो लागू होईल आणि व्यवहाराची मर्यादा काय असेल, याबाबत अद्याप अंतिम अधिकृत निर्णय झालेला नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य ग्राहकांना यामुळे घाबरण्याचं कारण नाही.
सामान्य नागरिकांकडून UPI पेमेंटसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी भूमिका सरकारकडून स्पष्ट करण्यात आली आहे. P2P व्यवहारही मोफतच राहणार आहेत. MDR लागू झाल्यास तो केवळ काही निश्चित मर्चंट व्यवहारांपुरता मर्यादित असण्याची शक्यता आहे.
UPIचा वापर प्रचंड वाढला :
गेल्या काही वर्षांत भारतातील डिजिटल पेमेंटचं चित्रच बदललं आहे. त्यात UPIचा वाटा सर्वाधिक महत्त्वाचा ठरला आहे. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये UPIवर सुमारे 2 कोटी व्यवहार झाले होते. ही संख्या तब्बल दहा वर्षांत प्रचंड वाढली असून आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये UPI व्यवहारांची संख्या 24,162 कोटींहून अधिक झाली आहे.
तर, 2016-17 मध्ये UPI व्यवहारांची एकूण किंमत सुमारे 0.07 लाख कोटी रुपये होती. ती 2025-26 मध्ये वाढून तब्बल 314 लाख कोटी रुपयांच्या आसपास पोहोचली आहे.






