UPI ठप्प: सर्व्हर डाऊनमुळे कोट्यवधी यूजर्स हैराण, आर्थिक व्यवहार अडचणीत

मुंबई: देशभरात यूपीआय पेमेंट सेवेत मोठी अडचण निर्माण झाली असून, गेल्या काही तासांपासून सर्व्हर डाऊन झाल्याने पैसे पाठवणं किंवा स्वीकारणं अशक्य झालं आहे. या समस्येचं नेमकं कारण अस्पष्ट असलं तरी, यूपीआयच्या या बिघाडामुळे देशाच्या आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. यूपीआयवर अवलंबून असलेल्या कोट्यवधी लोकांचे रोजचे व्यवहार थांबले असून, डिजिटल पेमेंटची वाढती गरज अधोरेखित झाली आहे.
डिजिटल युगात संकट –
ऑनलाइन पेमेंटचं महत्त्व वाढलेल्या या काळात लोक रोख रकमेपेक्षा मोबाइलवरच पैसे ठेवतात आणि सेकंदात पैसे हस्तांतरित करतात. यामुळे बँकिंग व्यवस्था सुलभ झाली असली, तरी यूपीआय सर्व्हर डाऊन झाल्याने अनेकांची कामं अडकली आहेत. मागील काही दिवसांत फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या अॅप्सनंतर आता फोनपे आणि गूगल पेसारख्या यूपीआय सेवांनीही यूजर्सना निराश केलं आहे.
NPCI चं स्पष्टीकरण –
यूपीआयचं व्यवस्थापन करणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने या संदर्भात एक्सवर निवेदन जारी केलं आहे. त्यात म्हटलंय की, “सध्या तात्पुरत्या तांत्रिक अडचणींमुळे यूपीआय सेवेत आंशिक खंड पडला आहे.” मात्र, ही समस्या कधी सुटेल, याबाबत ठोस माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे यूजर्समध्ये संभ्रम आणि नाराजी वाढत आहे.





