DA hike : 14 लाख कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; महागाई भत्ता तब्बल 5 टक्क्यांनी वाढला
DA hike : योगी सरकारने उत्तर प्रदेशातील १४ लाखांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५ टक्क्यांनी वाढवला. डीए आता ६३ टक्के झाला असून जुलै २०२६ पासून थकबाकी मिळणार आहे.

DA hike : उत्तर प्रदेशातील योगी सरकारने राज्यातील १४ लाखांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठी भेट दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६३ टक्के झाला आहे. ही वाढ १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहे.
प्रमुख सचिव आलोक कुमार यांनी ७ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील शासनादेश जारी केला. नियमित पूर्णवेळ सरकारी कर्मचारी, अनुदानित शिक्षण संस्था, तांत्रिक शिक्षण संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी आणि कार्यभारित कर्मचाऱ्यांना या वाढीचा लाभ मिळणार आहे. यूजीसी वेतनश्रेणीनुसार काम करणारे कर्मचारीही यासाठी पात्र असतील.
जुलै ते ऑक्टोबर २०२६ या चार महिन्यांची थकबाकी भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) खात्यात जमा केली जाईल. नोव्हेंबर महिन्याच्या पगारासोबत वाढीव महागाई भत्ता रोख स्वरूपात मिळेल.
राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीतील १० टक्के रक्कम टियर-१ पेन्शन खात्यात जमा होईल. त्यावर सरकारकडून १४ टक्के योगदान दिले जाईल. उर्वरित ९० टक्के रक्कम सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या (एनएससी) स्वरूपात दिली जाईल.
दरम्यान, शासनादेश जारी होण्यापूर्वी सेवा संपलेल्या किंवा १ जुलै २०२६ पासून शासनादेश जारी होईपर्यंत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना थकबाकीची संपूर्ण रक्कम रोख मिळणार आहे. पुढील सहा महिन्यांत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या व्यवस्थेचा लाभ मिळेल.
यापूर्वी योगी सरकारने कर्मचाऱ्यांना २०२५-२६ या वर्षासाठी ३० दिवसांचा तदर्थ बोनस जाहीर केला होता. या बोनसची कमाल रक्कम सात हजार रुपये आहे. पात्र कर्मचाऱ्यांना बोनसपैकी ७५ टक्के रक्कम जीपीएफ खात्यात जमा होईल, तर उर्वरित २५ टक्के रक्कम रोख मिळेल.





