#UP Election 2022: निकाल काहीही येवो; लढा सुरूच राहील- प्रियंका गांधी

विकास, प्रशासन, अर्थकारण हे मुद्दे राजकारणात पुढे असावेत
लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल काहीही येवो. त्या राज्यातील जनतेच्या हक्कांसाठीचा लढा सुरूच राहील, अशी ग्वाही कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी दिली.
तब्बल 33 वर्षांपासून कॉंग्रेस उत्तर प्रदेशच्या सत्तेपासून दूर आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे पक्ष संघटन कमजोर बनल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत त्या पक्षाची निवडणुकीत चांगली कामगिरी होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. त्या पार्श्वभूमीवर, पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रियंका यांनी भूमिका मांडली.
मागील काही दशकांत उत्तर प्रदेशात कॉंग्रेस संघटन कमजोर झाल्याचे त्यांनी मान्य केले. त्याचवेळी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कॉंग्रेसकडून होत असलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मागील काही निवडणुकांत इतर पक्षांशी आघाड्या केल्याने उत्तर प्रदेश विधानसभेच्या 403 पैकी 200 ते 300 जागांवर कॉंग्रेसला उमेदवार देता येऊ शकले नाही. मात्र, यावेळी पक्षाने 400 उमेदवार दिले आहेत. त्यामुळे नवे नेतृत्व पुढे येईल. तसेच, पक्ष संघटना मजबूत होण्यास हातभार लागेल, असे त्यांनी म्हटले.
उत्तर प्रदेशातील राजकारणाचा भर जात-धर्मावर अधिक दिसतो. त्यामुळे आत्मसंतुष्ट बनलेले राजकीय नेते मूळ मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. तशा राजकारणाने राज्याच्या प्रगतीत कुठले योगदान दिले जाऊ शकत नाही. राजकारणात विकास, प्रशासन आणि अर्थकारण हे मुद्दे पुढे असायला हवेत, असेही प्रियंका यांनी म्हटले.





