Weather Update : महाराष्ट्रावर अवकाळीची छाया! गुढीपाडव्याला पावसाची शक्यता, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा
Weather Update : राज्यात उष्णतेचा पारा वाढला असतानाच गुढीपाडव्याच्या मुर्हतावर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Weather Update : राज्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या मध्यात अनेक ठिकाणी उन्हाच्या कडक झळा बसत आहेत. विदर्भात प्रचंड उकाडा जाणवत असून, काही ठिकाणी उन्हाचा पारा चाळीच्या पार गेला आहे.
अशातच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात अनेक भागात पावसाची हजेरी लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तर गारपिटीचा इशारही देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ ते २० मार्च या कालावधीत कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बुधवारी १८ मार्च या दिवशी विदर्भातील अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता आहे.
तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव आणि लातूरसह मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.
हेही वाचा : NIA Action: देशातील मोठा दहशतवादी कट उधळला ; राष्ट्रीय तपास संस्थेकडून ७ परदेशी नागरिक ताब्यात
कोकणातील दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी Weather Update
कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
१३ जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता Weather Update
विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा वाढला आहे. येथील काही भागात ४० अंशावर तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या उत्तर कोकण पट्ट्यासह नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या १३ जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
शेतकऱ्यांना फटका Weather Update
सध्या राज्यात रब्बी हंगाम सुरू असून, अवकाळी पाऊस झाल्यास याचा मोठा फटका काढणीला आलेल्या पीकांना बसेल. परिणामी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाईल.
त्यामुळे शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.





