राज्यात अवकाळीचा कहर सुरूच…! पुढील सहा दिवस महत्वाचे, या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

Rain Update : राज्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत असून, कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाच्या सरी बरसत आहे. आता नव्या अंदाजानुसार पुढीस सहा दिवस अत्यंत महत्वाचे सांगण्यात आले आहेत. याचे कारण म्हणजे मान्सूनपूर्व पाऊसाला केरळ राज्यात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, यामुळे केरळात मान्सूनपूर्व पाऊस दाखल होणार आहे.
दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यालगत पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, हे क्षेत्र हळूहळू उत्तरेकडे सरकत आहे. यामुळे पुढील सहा ते सात दिवस गुजरात, कोकण, गोवा कर्नाटक आणि केरळ येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच वादळासारखी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.
स्कायमेट वेदरनुसार, पुढील २४ तासांमध्ये अवकाळी पाऊस विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, किनारी कर्नाटक आणि केरळमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पडू शकतो. तर काही एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आयएमडीच्या मते, पुढील २-३ दिवसांत मान्सून केरळ राज्यात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. याचाच अर्थ यंदाच्या वर्षी मान्सूनपूर्व पाऊस वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार आहे.
या राज्यातही पावसाची हजेरी
महाराष्ट्रासह ईन्शानेकडील राज्यातही जोरदार पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सिक्कीम, पश्चिम बंगाल, ईशान्य भारत, ओडिशा, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि अंतर्गत कर्नाटकमध्ये ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. यामुळे वादळासह जोरदार पाऊस येऊ शकतो.





