पुणे जिल्हा | जुन्नर परिसरातल अवकाळी पावसाने धुतले

जुन्नर, (वार्ताहर)- शहर परिसरात शुक्रवारी (दि. 10) दुपारी तीननंतर ढगांच्या गडगडाटात वादळी वार्यासह अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. जुन्नरची शिवाई देवी यात्रेचा दुसरा दिवस असताना या यात्रेमध्ये बाहेरगावून आलेल्या विविध लहानमोठ्या व्यवसायिकांची पावसामुळे मात्र मोठी धावपळ उडाली.
सध्याच्या कडक उन्हाळ्यामुळे सर्वच जण हैराण झालेले आहेत. त्यातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम राहिल्याने चांगलाच उकाडा जाणवत होता. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ पावसाळी वातावरण तयार होऊन दुपारी तीननंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांचा जोरदार गडगडाट, वादळी वार्यासह झालेल्या या मुसळधार पावसामुळे ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरणाचा अनुभव नागरिकांना आला.
शेतकर्यांकरिता हा पाऊस गरजेचा असून टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, ज्वारी आदी पिकांना हा पाऊस पोषक राहणार आहे. मात्र शेतात असलेला कांदा, आंबा तसेच बाजरी उत्पादकांना या पावसामुळे नुकसान होणार आहे. जुन्नरचा पश्चिम मध्य व पूर्व भागात शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
जुन्नरच्या पश्चिम भागात जोरदार वादळी पाऊस झाला. येणेरे, निरगुडे, खानगाव, आपटाळे आदी गावांमध्ये झालेल्या या पावसामुळे काढणीस आलेल्या आंब्याचे मोठे नुकसान झाले. तर शेतामध्ये असलेल्या कांद्याच्या आरणी झाकण्याकरिता शेतकर्यांची तारांबळ उडाली; मात्र अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे हवेत गारवा आल्याने काहीसा दिलासा मिळाला.





