Pune District : वाल्हे येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
Pune District : पावसापासून संरक्षणासाठी विक्रेते, ग्राहक आडोसा शोधत होते. तसेच विक्रीसाठी आणलेला माल ओला होऊ नये, म्हणून धावपळ करीत होते.

वाल्हे : मागील काही दिवसांपासून वाल्हे परिसराला मान्सूनपूर्व पाऊस हुलकावणी देत होता. मात्र, मंगळवारी (दि. २ जून) रोजी सायंकाळी पाचनंतर सोसाट्याच्या वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वाल्हेतील आठवडे बाजारात नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.
आठवडे बाजारात वाल्हे पंचक्रोशीतील तसेच, पिंगोरी, हरणी, जेऊर, पिसुर्टी, दौंडज, लोणंद, नीरा, दौंडज या भागातील शेतकरी, व्यापारी, नागरिक खरेदी-विक्रीसाठी येत असतात. या सर्वच नागरिकांची अचानक आलेल्या पावसाने तारंबळ झाली. पावसापासून संरक्षणासाठी विक्रेते, ग्राहक आडोसा शोधत होते. तसेच विक्रीसाठी आणलेला माल ओला होऊ नये, म्हणून धावपळ करीत होते.
बर्याच नागरिकांना बाजार आटोपता घेऊन घरी परतावे लागले. तर शेतकरी, व्यापाऱ्यांनी विक्रीस आणलेल्या शेतीमाल, फळ विक्रेत्यांना कमी दरात विकावा लागला. पावसामुळे वाल्हे गावांतर्गत रस्त्यावर पावसाचे पाणी वाहू लागल्याने नागरिकांचे आणि विक्रेत्यांचे हाल झाले. तसेच मालाचेही नुकसान झाले.
भाजी विक्रेते, खाद्य पदार्थ विक्रेते, कापड विक्रेते, धान्य विक्रेते पाण्यापासून मालाचे संरक्षण व्हावे म्हणून छत्री, प्लॅस्टिक, बारदाना याचा आधार घेत होते. पाऊस कमी होताच ग्राहकांनी घरची वाट धरली. तर, वाड्या-वस्त्यांवरून शेतमाल विक्रीसाठी आणलेला शेतकरी आपला शेतमाल गाडीत भरून निघण्याची तयारी करत होता. दरम्यान, वाल्हे परिसरात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम शेतातील काही पिकांवर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Pune District : पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाहीत : कृषीमंत्री भरणे





