Unseasonal Rain – बावडा परिसरातील अनेक गावांमध्ये गुरुवारी सायंकाळी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने शेतकर्यांच्या कष्टांवर अक्षरशः पाणी फेरले. सुमारे अर्धा तास झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाला आहे. अचानक आलेल्या या गारपिटीमुळे काढणीच्या टप्प्यावर असलेले गहू, हरभरा, ज्वारी, मका आदी पिके जमीनदोस्त झाली. अनेक शेतांमध्ये पिके आडवी पडल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गारपिटीचा फटका परिसरातील डाळिंब, द्राक्ष, पेरू, केळी या फळबागांनाही बसला आहे. फुलोर्याच्या अवस्थेत असलेल्या डाळिंब व पेरू बागांतील फुले गळून पडली आहेत, तर काढणीस तयार असलेल्या द्राक्षबागांमध्ये गारांच्या मार्यामुळे द्राक्षांना तडे जाऊन मणी गळून पडले आहेत. त्यामुळे उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. चारा पिके जमिनीवर लोळून पडल्याने जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच आंबा बागांमध्येही मोठ्या प्रमाणावर फळगळती झाल्याचे शेतकर्यांनी सांगितले. मदतीची मागणी या अवकाळी पावसाच्या तडाख्याने आधीच अडचणीत असलेल्या शेतकर्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी बावडा परिसरातील शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.