Pune Zilla Parishad – पुणे जिल्हा परिषदेला मिळालेला राज्यस्तरीय बहुमान हा केवळ प्रशासनाचा विजय नसून, तो संपूर्ण जिल्ह्यातील जनतेने ठेवलेल्या विश्वासाचे फलित आहे. ई-गव्हर्नन्स माध्यमातून पारदर्शक आणि गतिमान सेवा देण्याचा प्रशासनाचा हा प्रयत्न लोकाभिमुख राजकारणाची नवी दिशा ठरेल, असे प्रतिपादन भाजप नेते व जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी केले. पुणे जिल्हा परिषदेला १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम” तसेच “राज्य सेवाकर्मी पुरस्कार” या उपक्रमांमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाल्याने जिल्ह्याच्या प्रशासनिक कार्यक्षमतेचा ठसा राज्यभर उमटला आहे. या दुहेरी यशामुळे विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रवीण माने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची भेट घेऊन सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले. ई-गव्हर्नन्सच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे प्रशासन अधिक पारदर्शक व गतिमान झाले असून, नागरिकांना जलद सेवा मिळण्यास मदत होत आहे. या यशामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून, प्रशासनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांना नवी दिशा मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.