बंगाल विधासभेत अभूतपूर्व राडा! ममता बॅनर्जींकडून मोदीविरोधी नारा; भाजपचे ५ आमदार निलंबित

कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभेत गुरुवारी नाट्यमय घडामोडीनंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी भाजप आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. यानंतर विधानसभेत अभूतपूर्व राडा झाल्याने कामकाज स्थगित करण्यात आले. या गोंधळानंतर भाजपच्या पाच आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
बंगाली स्थलांतरितांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत सत्ताधारी पक्षाने आणलेल्या प्रस्तावावर चर्चा सुरू होती. यादरम्यान विरोधी पक्षाने (भाजप) घोषणाबाजी केली. या प्रस्तावावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बोलत होत्या. त्यानंतर भाजप आमदारांनी 2 सप्टेंबर रोजी विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांच्या झालेल्या निलंबनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्याला तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी विरोध केला.
सभापती बिमन बॅनर्जी यांनी गोंधळ निर्माण केल्याच्या आरोपावरून भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांना विधानसभेतून निलंबित केले. घोष यांनी बाहेर जाण्यास नकार दिल्यावर मार्शलना बोलावण्यात आले आणि त्यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले. त्यांना बाहेर काढताना ते बेशुद्ध पडले, त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. घोष यांच्याव्यतिरिक्त, भाजपचे आणखी दोन चार आमदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे.
ममता बॅनर्जी आपल्या भाषणात म्हणाल्या, भाजपची हुकूमशाही आणि वसाहतवादी मानसिकता आहे, ती बंगालला आपली वसाहत बनवू इच्छिते. आम्ही हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही, परंतु भाजप बंगाली विरोधी आहे. भाजपने देशाचा सन्मान परदेशी शक्तींना विकला आहे.
केंद्र कधी अमेरिकेसमोर भीक मागते, तर कधी चीनसमोर, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. भाजप मते चोरण्यात गुंतलेली आहे, परंतु इतरांना लोकशाही प्रक्रियेवर व्याख्याने देतात. भाजप हा मतदान चोर आहे, त्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी लोकांचा जनादेश चोरला आहे, असे त्यांनी म्हटले.
यावेळी विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांना २ सप्टेंबर रोजी विशेष अधिवेशनासाठी निलंबित केल्याबद्दल भाजप आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनीही जोरदार नारेबाजी सुरू केली. याप्रसंगी गोंधळ सुरूच राहिल्याने सभापती बिमन बॅनर्जी यांनी उर्वरित दिवसासाठी कामकाज स्थगित केले.





