अभूतपूर्वक्षण…! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार; ‘सामना’तून विजयी मेळाव्याचे ठिकाण जाहीर

Samana News Paper : हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी एकत्रित मोर्चा घेण्याचे ठरवले होते. मात्र, या मोर्चाच्या अगोदर आणि विधिमंडळाचे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्ती निर्णयाचा जीआर रद्द करत असल्याचे जाहीर केले. यानंतर आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून विजयी मेळाव्याचे ठिकाण जाहीर करण्यात आले आहे.
या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर पहिल्यांदाच दिसणार आहेत. हा खरंतर राज्याच्या राजकारणातील एक अभूतपूर्व क्षण असणार आहे. ५ जुलै रोजी हा दिवस मराठी विजय दिवस म्हणून साजरा केला जाणार असून, वरळी येथील डोम सभागृहात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे सामनात म्हटले आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
‘या’ नेत्यांचा पुढाकार
५ जुलैच्या विजयी मेळाव्याच्या नियोजनसाठी शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षातील नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी ठाकरे गटाकडून संजय राऊत, अनिल परब, वरुण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई या नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. या नेत्यांमध्ये मेळव्याच्या तयारीसंदर्भात बैठका सुरू आहेत.
जय महाराष्ट्र pic.twitter.com/BfChvSSfIf
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 1, 2025
काय म्हटलयं ‘सामना’त?
सामनाच्या आजच्या अंकात म्हटलंय की, हिंदी सक्तीविरोधात मराठी माणसाने पुकारलेल्या एल्गारमुळे सरकारला गुडघे टेकावे लागले आणि त्रिभाषा धोरणासंदर्भातील शासकीय आदेश मागे घ्यावा लागला. हा मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रचंड विजय असून, ५ जुलै हा दिवस ‘मराठी विजय दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. वरळी येथील डोम सभागृहात होणाऱ्या या विजयोत्सवाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहणार असून, मेळाव्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
हेही वाचा : एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात ! आजपासून कमी झाल्या किमती ; वाचा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर





