महामार्ग देखभाल विभागाचा नियोजनशून्य कारभार

कराड – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कामे सुरू आहेत. कराड परिसरात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाल्याने, तालुक्यातील आटके टप्पा व पाचवड फाटा येथे महामार्गावर पाणी साचून, वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. ही माहिती समजताच माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण भडकले. त्यांनी कराड येथे शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांची तातडीने बैठक घेतली. वाहतूक कोंडीची समस्या गांभीर्याने घेऊन, त्यावर उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या.
‘दक्ष कराडकर’ संस्थेचे प्रमुख प्रमोद पाटील यांनी माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देऊन, महामार्गावरील वाहतूक समस्येची माहिती दिली. या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन, आ. चव्हाण यांनी स्वतः पाहणी केली. शासकीय विश्रामगृहात महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांची बैठक घेऊन, तिथूनच प्राधिकरणाचे प्रकल्प्रमुख पंधरकर यांना दूरध्वनी केला. कराड येथे महामार्गाच्या कामाची परिस्थिती सांगून, पावसाने महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक समस्या उद्भवत असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर महामार्ग प्राधिकरणाच्या नियोजनशून्य कारभाराबद्दल संताप व्यक्त केला.
महामार्गावरील नियोजनशून्य कामामुळे नागरिकांना पहिल्या पावसातच समस्यांना सामोरे जावे लागले. यामध्ये सुधारणा करून, आटके टप्पा व पाचवड फाटा येथे सेवा रस्त्यांवर साचलेले पाणी जाण्यासाठी तात्काळ ड्रेनेज मार्ग करावा. येथून पुढील काम नियोजनबद्ध पद्धतीने करावे, अशा सक्त सूचना आ. चव्हाण यांनी दिल्या. त्यानंतर महामार्ग देखभाल दुरुस्ती विभागाच्या अधिकार्यांनी त्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने पाणी जाण्यासाठी मार्ग केल्याने काही वेळातच वाहतूक पूर्ववत झाली.
महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू झाल्यापासून आ. चव्हाण यांनी दर 15 दिवसांनी आणि त्यानंतर वेळोवेळी अधिकार्यांसोबत बैठका घेऊन कामाचे नियोजन बघितले. कराड व मलकापूर येथील उड्डाणपुलाच्या कामावेळी आ. चव्हाण यांनी वारंवार पाहणी करून, ही कामे वेळेत व्हावीत आणि वाहतूक समस्या होऊ नये, यासाठी अधिकार्यांना सूचना दिल्या होत्या. आता उड्डाणपुलाचे काम निम्याहून अधिक झाले आहे. कोल्हापूर दिशेने महामार्ग विस्ताराचे काम सुरू आहे. तेथे उद्भवलेल्या समस्यांबाबत पुन्हा बैठक घेऊन आ. चव्हाण यांनी अधिकार्यांना सूचना दिल्या.





