भाजपच्या 6 उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित; उत्तरप्रदेश विधान परिषद निवडणूक

लखनौ -विधानसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीने उत्तरप्रदेशचे राजकारण तापले आहे. त्या निवडणुकीतही भाजपच्या सरशीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आतापर्यंत भाजपच्या 6 उमेदवारांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
उत्तरप्रदेशात विधान परिषदेच्या 36 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक असलेल्या समाजवादी पक्षाच्या (सप) 2 उमेदवारांचे अर्ज मंगळवारी फेटाळण्यात आले. त्याच दिवशी सपचा मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रीय लोक दलाच्या एका उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे भाजपच्या 3 उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
त्यापाठोपाठ विरोधी गोटातील आणखी 3 उमेदवार अर्ज मागे घेतल्याने किंवा ते फेटाळण्यात आल्याने निवडणूक रिंगणातून बाहेर पडले. त्यामुळे तेवढ्याच संख्येने भाजपच्या आणखी उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने उत्तरप्रदेशची सत्ता राखली. आता त्या राज्याच्या विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही बहुमत मिळवण्यासाठी सत्तारूढ पक्षाने कंबर कसली आहे.





