Koregaon News : कोरेगाव पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा ‘गुलाल’! पाहा कोण ठरलं सभापती-उपसभापती
Koregaon News : नुकत्याच झालेल्या निवडणुकीत १२ पैकी ९ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीने कोरेगाव तालुक्यावर आपली पकड अधिक मजबूत केली आहे.

Koregaon News – पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची निवड सोमवारी दुपारी बिनविरोध पार पडली. सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ल्हासुर्णे गणातील सदस्या रुपाली गुरव तर उपसभापतीपदी आर्वी गणातील सदस्य रविंद्र पवार यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समिती सभागृहात अध्यासी अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी झालेल्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या.
कोरेगाव पंचायत समितीत एकूण १२ सदस्यसंख्या आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्रितपणे निवडणूक लढवत स्पष्ट बहुमत मिळवले होते. १२ पैकी ९ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीवर मजबूत पकड निर्माण केली होती. त्यामुळे सभापती व उपसभापतीपदाच्या निवडीसाठी पक्षामध्ये एकमत साधण्याचे प्रयत्न सुरू होते.
सभापती पद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने ल्हासुर्णे व वाठार किरोली गणातील महिला सदस्यांमध्ये उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुढाकार घेत निवडी बिनविरोध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले.
यासाठी रविवारी रात्री कोरेगाव बाजार समितीच्या सभागृहात पक्षातील प्रमुख पदाधिकारी व सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत चर्चेनंतर सभापतिपदासाठी रुपाली गुरव तर उपसभापतीपदासाठी रविंद्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. निवड जाहीर झाल्यानंतर गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सहाय्यक गट विकास अधिकारी लालासाहेब गावडे यांच्यासह सर्व प्रशासकीय खाते प्रमुखांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
पंचायत समिती परिसरात आनंदोत्सव
राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका दीर्घकाळ रखडल्या होत्या. न्यायालयाच्या निर्णयानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने कोरेगाव तालुक्यात उल्लेखनीय यश मिळवले. सोमवारी सभापती व उपसभापती निवडीनंतर पंचायत समिती परिसरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.





