Pune Gramin : “उरळगावात शेतकऱ्याची दीड लाखाची डाळींब लूट! अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ”

शिरूर : शिरूर तालुक्यातील उरळगाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या शेतात घुसून तब्बल १.५१ लाख रुपयांचा डाळींब माल चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपासाला गती देण्यात आली आहे.
शेतकरी अमोल बाळासाहेब आफळे (वय ३२, रा. आफळे वस्ती, उरळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या गट क्रमांक ५१० मधील दोन एकर शेतातील २५२ डाळींब झाडांवरील सुमारे १५१२ किलो भगव्या जातीचा लाल रंगाचा डाळींब माल चोरट्यांनी लंपास केला.
ही चोरी २१ जून २०२५ रोजी रात्री ९ ते २२ जून पहाटे ५ च्या दरम्यान घडली. बाजारभावानुसार १०० रुपये प्रति किलो दराने या मालाची किंमत १,५१,२०० रुपये आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, त्यांनी पोलीस प्रशासनाकडे रात्रगस्ती वाढवण्याची आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. शिरूर पोलीस ठाण्यात २६ जून रोजी सायंकाळी ७:४८ वाजता या घटनेची नोंद झाली.
पोलीस हवालदार भोते यांच्यासह पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. शेतकऱ्यांनी शेत परिसरात सुरक्षाव्यवस्था वाढवावी आणि चोरट्यांना लवकरात लवकर पकडावे, अशी मागणी लावली आहे.




