SET Exam 2026 : विद्यापीठाची सेट परीक्षा पुन्हा लांबणीवर; नवी तारीख समोर
SET Exam 2026 : आता २७ सप्टेंबरला होणार परीक्षा

पुणे – सहायक प्राध्यापक पदासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. ६ सप्टेंबर रोजी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) होणार असल्याने सेट परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता २७ सप्टेंबर रोजी परीक्षा घेतली जाणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे याची माहिती दिली. यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र, गोवा राज्यात ही सेट परीक्षा आयोजित केली जाते. त्यानुसार ४१ वी सेट परीक्षा २६ जुलै रोजी आयोजित केली होती. मात्र, त्याच दिवशी एमपीएससी सरळसेवा भरतीअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध विषयांची परीक्षा होती.
तसेच ७ ते २६ जुलै या कालावधीत आषाढी वारी असल्याने वाहतुकीची गैरसोय होऊन परीक्षा नियोजन आणि उमेदवारांना परीक्षेसाठी वेळेत पोहोचण्यात गैरसोय निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे २६ जुलै रोजीची सेट परीक्षा पुढे ढकलून ६ सप्टेंबर ही संभाव्य तारीख घोषित करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर, आता ६ सप्टेंबर रोजी सीबीएसईची सीटीईटी ही परीक्षा पूर्वनियोजित असल्याने त्याच दिवशी सेट परीक्षा आयोजित केल्यास उमेदवारांना कोणत्याही एका परीक्षेपासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे आता ही सेट परीक्षा २७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Pimpri : मोशी डेपोत कचरा टाकण्यास ग्रामस्थांचा विरोध; आयुक्तांच्या दालनात चर्चा





