पुणे : देशातील नामांकित शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय मानांकनात (एनआयआरएफ) मोठी घसरण झाली आहे. मागील वर्षी ३७व्या स्थानावर असलेले हे विद्यापीठ यंदा थेट ९१व्या स्थानावर पोहोचल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विद्यापीठाच्या या अधोगतीला प्रशासनातील अंतर्गत कुरघोडीचे राजकारण आणि समन्वयाचा अभाव कारणीभूत असल्याचा थेट आरोप करत युवा सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला धक्का लागलेल्या या प्रकरणानंतर प्रशासकीय कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. युवा सेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी विद्यापीठाच्या या घसरलेल्या कामगिरीसाठी संपूर्ण प्रशासन, व्यवस्थापन परिषद आणि अधिकार मंडळाला जबाबदार धरले आहे. प्रशासनाने प्राध्यापकांची कमतरता हे कारण पुढे करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला असला तरी, कुलगुरू, प्र-कुलगुरू, प्रभारी कुलसचिव आणि संबंधित सदस्य या अपयशाचे समान वाटेकरी असल्याचा दावा यादव यांनी केला. कुलसचिव पदाच्या नियुक्तीवरून चालणारे राजकारण आणि अधिकार मंडळातील सदस्यांची स्वार्थी भूमिका विद्यापीठाच्या पतनास कारणीभूत ठरली आहे. एकेकाळी देशात १६व्या क्रमांकावर असलेले पुणे विद्यापीठ आज सिंबायोसिससारख्या अभिमत संस्थांच्याही मागे पडले आहे, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे,” असेही यादव म्हणाले. या गंभीर परिस्थितीची नैतिक जबाबदारी स्वीकारून व्यवस्थापन परिषद आणि अधिसभेतील सर्व सदस्यांनी तात्काळ सामूहिक राजीनामे द्यावेत, अशी मागणी युवा सेनेने केली आहे. तसेच, कुलगुरूंनी या अपयशाची जबाबदारी न स्वीकारल्यास युवा सेनेच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे विद्यापीठातील वातावरण आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.