शिरूरमध्ये आंदोलनाचा अनोखा मार्ग, कार्यकर्त्यांचं मुंडण, महिलांचा केसांच्या बटा कापून निषेध; आजपासून आमरण उपोषण

शिरूर (पुणे) : तालुक्यातील अत्यंत निकृष्ट दर्जाच्या रस्ते आणि पुलाच्या कामांवर संतप्त प्रतिक्रिया देत नागरिकांनी एक आगळावेगळं आंदोलन छेडलं आहे. मलठण ते आमदाबाद रस्त्याच्या खराब कामाला आणि कोंढण ओढ्याच्या पुलाच्या अशास्त्रीय बांधकामाला विरोध करत आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनाचं नेतृत्व निलेश वाळुंज करत आहेत.
विशेष म्हणजे, निषेधाच्या अनोख्या पद्धतीने आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं. काही पुरुष कार्यकर्त्यांनी मुंडण करून तर महिलांनी केसांचे बट कापून तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलनस्थळी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे.
निकृष्ट कामाची चौकशी आणि अहवालाची मागणी
शिरूर तालुक्यातील मलठण ते आमदाबाद मार्ग आणि कोंढण ओढ्यावर उभारण्यात आलेल्या पुलाच्या दर्जाविषयी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, वारंवार निवेदन दिल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने संतप्त जनतेने आक्रमक आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. आता या दोन्ही कामांची निष्पक्ष चौकशी करून अहवाल जनतेसमोर सादर करावा, अशी मागणी आंदोलक करत आहेत.
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन; आंदोलकांचा इशारा
या आंदोलनात महिलांपासून युवकांपर्यंत सर्व स्तरांतील नागरिक सहभागी झाले असून परिसर संतप्त घोषणांनी दणाणून गेला आहे. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. परिणामी, तालुक्याचं वातावरण अजूनच तापण्याची शक्यता आहे.
सरकारला लोकभावनांचा आदर करावा लागणार!
या आंदोलनामुळे शिरूर तालुक्याचं लक्ष आता प्रशासनाच्या उत्तरावर केंद्रित झालं आहे. जनतेच्या रोषाचा अंदाज घेत प्रशासनाकडून त्वरीत पावले उचलली जाणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.





