मांजरी बुद्रुक येथील साचलेल्या पाण्याविरोधात अनोखे आंदोलन; गजेंद्र मोरे यांनी पाण्यात सोडली होडी

मांजरी – मांजरी बुद्रुक येथील मुळा-मुठा नदीवरील पुलाच्या सखल भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत आहे. या पाण्यातून वाट काढणे पादचारी आणि दुचाकीस्वारांसाठी जिकिरीचे ठरत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र बाबा मोरे यांनी साचलेल्या पाण्यात होडी सोडून अनोखे आंदोलन केले.
मांजरी बुद्रुक येथील मुळा-मुठा नदीवरील पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला आहे, तर पुलाच्या पुढील भागात पीएमआरडीएने रस्त्याचे काम केले आहे. मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत आता पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्याने या भागात महानगरपालिकेचा कारभार सुरू आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए आणि पुणे महानगरपालिका या तीनही विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने रस्ता आणि पूल यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. परिणामी, प्रत्येक पावसाळ्यात या भागात पाणी साठून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पादचाऱ्यांना पाण्यातून वाट काढणे कठीण झाले असून, दुचाकी चालवणेही धोक्याचे ठरत आहे.
तीन विभागांमधील समन्वयाचा अभाव; नागरिक त्रस्त –
मांजरी बुद्रुक रेल्वे गेट ते मुळा-मुठा नदी स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. मात्र, अनेक वर्षे उलटूनही हे काम पूर्ण झालेले नाही. याशिवाय, पुलाचे काही कामही प्रलंबित आहे. अवघ्या दोन ते अडीच किलोमीटरच्या या रस्त्यावर तीन विभाग एकाच वेळी काम करत असले, तरी समन्वयाअभावी कामे रखडली आहेत. यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गजेंद्र बाबा मोरे यांनी या आंदोलनाद्वारे प्रशासनाचा निषेध नोंदवताना सांगितले, “या भागातील नागरिकांचे हाल होत आहेत. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी आणि रस्त्याचे काम पूर्ण करावे.” त्यांच्या या अनोख्या आंदोलनाने परिसरात चर्चा निर्माण झाली असून, प्रशासन या समस्येचे निराकरण करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





