पाणीप्रश्नी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन; महापालिकेत नगरसेवक ढोरे यांनी घेतली “कावड”

फुरसुंगी- पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या फुरसुंगी आणि उरूळीदेवाची परिसराल मुबलक पाणी देण्याची जबाबदारी पालिकेची आहे. याकामी येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत योजनेचे काम बंद असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक गणेश ढोरे यांनी आज मुख्य सभागृहात पाण्याची कावड नेत अनोखे आंदोलन केले.
फुरसुंगी-उरुळी देवाची ग्रामीण भागासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम निधीअभावी बंद आहे. या योजनेत पाण्याची लाइन टाकल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याचा खर्च वाढला आहे, सदर खर्च एकदाच मनपाने केल्यास या दोन गावांतील 2.5 ते 3 लाख लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. परंतु, केवळ वाढीव खर्चामुळे महापालिकेचे या योजनेकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे फुरसुंगी आणि देवाची उरूळी या भागाचा पाणी प्रश्न रेंगाळला आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे तसेच अनेकदा निवेदनेही देण्यात आली आहेत. परंतु, याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनोखे आंदोलन करून प्रशानाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असल्याचे नगरसेवक ढोरे यांनी सांगितले.
योजनेचे काम पूर्ण व्हावे यासाठी गेली दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. पुणे मनपा सदर योजनेचा निधी “एमजेपी’कडे वर्ग करत नाही. तसेच, दरवर्षी 7 ते 8 कोटी रुपये वार्षिक पाण्याच्या टॅंकर साठी खर्च करत आहे. हा उरफटा कारभार प्रशासनाकडून सुरू असून प्रशासनाचा व सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध करीत आहे. – गणेश ढोरे, नगरसेवक





