‘दुर्दैव.! न्यायालयीन कामकाजात राजकारण आणण्याचा प्रयत्न’ – माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड

नवी दिल्ली – देशात सध्या न्यायालयीन कामकाजात मोठ्या प्रमाणावर राजकारणण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, काही वकीलच हे जाणीवपूर्वक करत आहेत. ही बाब न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने चिंतेची आहे, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त केले.
एखाद्या न्यायाधीशाने दिलेला निर्णय अनेकांना पटत नाही. त्यावर त्या निर्णयावर टीका केली जात नाही तर न्यायाधीशाच्या हेतूवर शंका घेतली जाते, असे घडता कामा नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
एका मुलाखतीत डी. वाय. चंद्रचूड यांनी हे वक्तव्य केले आहे. डी. वाय. चंद्रचूड म्हणाले, एखादा निर्णय आवडला नाही तर त्याबाबत कुणालाही त्याबाबत मत मांडू शकता. निर्णय आवडला नाही म्हणून तुम्ही टीका करु शकता किंवा निर्णय आवडला म्हणून स्वागतही करु शकता.
पण हल्ली असा एक ट्रेंड आला आहे न्यायाधीशांनाच नावं ठेवली जातात. ही बाब दुर्दैवी आहे. निर्णय पटला नाही तर ते मला अगदीच मान्य नाही. पण त्यामागे न्यायाधीशांचा काहीतरी हेतू आहे हे सांगणे हे योग्य नाही. सगळे वकील असे नाही पण काही वकील असे करतात जे योग्य नाही.
सध्या न्यायालयाच्या कामकाजात खूप जास्त राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे एखादा निर्णय पटला नाही की थेट त्या न्यायाधीशाच्या हेतूवर संशय घेतला जातो. न्यायदानाचे शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये तर हे रोज होते की तुम्ही एखाद्या निर्णयाला पाठिंबा देता किंवा एखाद्या निर्णयावर टीका करता. पण न्यायाधीशांवर जेव्हा हेतू लादला जातो तेव्हा न्यायव्यवस्थेवर जो लोकांचा विश्वास आहे त्याला कुठे तरी तडा देण्याचे काम केले जात आहे, असेही त्यांनी म्हटले.
वर्मा प्रकरणात सत्य समोर आले पाहिले
यशवंत वर्मा प्रकरणात संसदेने समिती तयार केली आहे. त्यात तीन सदस्य आहेत. या समितीने या प्रकरणी तपास सुरु केला आहे. यातील सर्वात महत्त्वाचा भाग काय? की त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार प्रदान केला जावा. मी मागच्या २५ वर्षांपासून न्यायाधीश म्हणून काम केले आहे. त्याआधी मी वकिलीही केली आहे.
माझा हा अनुभव आहे की अनेकदा आपल्या समोर जे येते ते सत्य नसतं, त्यापेक्षा वेगळ असतं. सत्याचे अनेक पैलू असतात ते नंतर समोर येतात. त्यामुळे यशवंत वर्मा प्रकरणात समितीसमोर सत्य आले पाहिजे. त्यानंतर ते समाजासमोरही आले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.





