दुर्दैवी: कालव्यात बुडून तीन लहान मुलांचा मृत्यू, नाशिक येथील घटना

नाशिक – येथील समर्थनगरमध्ये कालव्यात बुडाल्याने तीन लहान मुलांचा मंगळवारी मृत्यू झाला. कालव्यातील पाण्याचा प्रवाहाचा वेग अधिक असल्याने पाण्याच्या खोलीचा मुलांना अंदाज न आल्याने ही दूर्घटना घडली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने धाव घेत या मुलांना कालव्याबाहेर काढले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
या कालव्याजवळ अनेक मुले खेळायला जातात. आज मंगळवारी गजवक्रनगर भागात असलेल्या नामको कॅन्सर हॉस्पिटलमागे राहणारी तीन मुले या ठिकाणी खेळण्यासाठी गेले होते. मात्र, कालव्यात पाणी सोडण्यात आले होते. ही खेळायला गेलेली मुले पोहण्यासाठी कालव्यात उतरली, पण पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे तिघेही पाण्यात बुडाले.
नीलेश मुळे, प्रमोद जाधव आणि सिद्धू धोत्रे त्यांची नावे आहेत. जीवरक्षक दलाच्या जवानांनी तिघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने त्यांना यश आले नाही. या मुलांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस अधिक तपास करत आहेत.





