Beed News : दुर्दैवी ! बीडमध्ये अपक्ष उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू

बीड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी आज संपूर्ण राज्यात मतदान पार पडत आहे. महायुती,महाविकास आघाडी आणि इतर पक्षांच्या एकूण 4136 उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. आज विरारमध्ये कर्तव्याला जात असताना आशा सेविकेचा मृत्यू, साताऱ्यात मतदान करताना ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू या घटना ताज्या असताना आता बीडमध्ये चक्क एका अपक्ष उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे.
बाळासाहेब शिंदे असे मृत पावलेल्या अपक्ष उमेदवाराचे नाव होते. त्यांनी बीड मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केला होता. ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आली अन् खाली पडले.
त्यानंतर त्यांना बीड शहरातील काकू नाना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.. तिथून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात देखील दाखल केले मात्र त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले. या दुर्देवी घटनेमुळे बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.





