लोणंदला अपघातात वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

लोणंद – लोणंद-फलटण रस्त्यावर विठ्ठलवाडी फाटा (तरडगाव) येथे भरधाव इनोव्हा कारची धडक बसल्याने मोटारसायकलवर मागे बसलेले रामचंद्र निवृत्ती बनकर (वय 70, रा. वेळापूर, ता. माळशिरस, जि.सोलापूर) हे ठार झाले तर मोटारसायकल चालक अतुल निशिकांत शिंदे (वय 50, रा. वेळापूर, ता. माळशिरस) हे गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात रविवारी दुपारी झाला. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, रविवारी (दि. 15) दुपारी 03:45 च्या सुमारास फलटण-लोणंद रस्त्यावर तरडगाव, ता. फलटण गावच्या हद्दीत विठ्ठलवाडी फाटा येथे इनोव्हा कारची (एमएच-04-जेयू-0007) व हिरो होंडा मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक बसली. इनोव्हा कार मुंजवडी, ता. फलटणहून ठाण्याकडे निघाली होती.

विठ्ठलवाडी फाट्यावर हिरो होंडा मोटारसायकल विठ्ठलवाडीकडून अचानक मुख्य रस्त्यावर आल्याने कारचालक रामा गणपती कांबळे (रा. डोंगरी, जि. ठाणे) गोंधळले. त्यांना कारचा वेग आवरता आला नाही. त्यामुळे कारची मोटारसायकलला पाठीमागून धडक बसली. त्यानंतर इनोव्हा कार रस्ता दुभाजकावरून लोणंद-फलटण लेनवर वाईकर पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या खांबाला जाऊन धडकली. या अपघाताची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली असून सपोनि संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दिघे तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.