पुणे | ११ किल्ल्यांची पाहणी करण्यास येणार “युनेस्को’चे पथक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांना “युनेस्को’ अर्थात United Nations Educational, Scientific and Cultural Organization – संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेचे पथक भेट देणार आहे.
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळण्यासाठी दिलेल्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यासाठी हे पथक या ११ किल्ल्यांना भेट देण्यासाठी येणार आहेत. त्यासाठी राज्याच्या पुरातत्त्व विभागाने तयारी सुरू केली आहे.
११ किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांत करावा, असा प्रस्ताव राज्य पुरातत्त्व विभागाने दिला होता. “युनेस्को’ने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार त्यांचे सदस्य या किल्ल्यांची पाहणी करायला येणार आहे.
यामध्ये पुरातत्त्व विभागाने किल्ल्यांवरील स्वच्छता, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच किल्ल्यांवरील प्रदर्शनासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये स्थानिक कला सादरीकरण, प्रदर्शन आणि इतर काही कार्यक्रमांचे नियोजन केले असून, ते अंतिम टप्प्यात आहेत.
लवकरच त्याची प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, अशी माहिती राज्य पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी दिली. विभागाने महाविद्यालये, स्वयंसेवा संस्था आणि गावकऱ्यांशी संपर्क साधून त्यांनाही या नियोजनात सहभागी करून घेणार असल्याचे वहाणे म्हणाले.





