पिंपरी | किल्ले लोहगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन

निलेश ठाकरे, (वार्ताहर) – जागतिक वारसा स्थळ यादीत किल्ले लोहगडाचा समावेश व्हावा, यासाठी केंद्र सरकारकडून नामांकन मिळाल्याबद्दल मावळवासियांनी आनंद व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पुरातत्व विभाग,
राज्य पुरातत्व विभाग व महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने रविवारी (दि.२२) लोहगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्ला फाटा ते लोहगड पायथा भव्य बाइक रॅली, शिवस्मारक येथे व्याख्यान, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
किल्ले जनजागृती मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लोहगड विसापूर विकास मंचचे संस्थापक सचिन टेकवडे आणि अध्यक्ष विश्वास दौंडकर यांनी केले आहे.
देशातील एकूण १२ किल्ल्यांना नामांकन –
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांपैकी १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडून नामांकन देण्यात आले आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील ११ आणि तमिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ११ पैकी एक किल्ला मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड हा देखील आहे.





