पिंपरी | ग्रामीण भागात अल्पवयीन वाहन चालक सुसाट…

कान्हे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात नाणे मावळ, पवन मावळ, आंदर मावळ तसेच अनेक शहरी ठिकाणी अल्पवयीन वाहन चालक सुसाटपणे वाहने चालवताना दिसतात.
दिवसेंदिवस अशा अल्पवयीन वाहन चालकांची संख्या वाढत चालली असून त्यावर आळा घालणे गरजेचे आहे. पालकांची बेफिकीरी, शाळा व्यवस्थापनाचे दुर्लक्ष आणि पोलिस प्रशासनाची जरब नसणे यामुळे अल्पवयीन वाहनचालक बेदकारपणे वाहने चालवत असून यातून अपघाताचा धोका संभवतो.
तालुक्यात ग्रामीण आणि शहरी भागात दोन्हीकडे अल्पवयीन मुले-मुली दुचाकीवर ट्रीपल सीट जातानाचे चित्र सर्रासपणे दिसते. कोणतेही प्रशिक्षण आणि मार्गदर्शन नसल्याने बेजबाबदारपणे आणि बेदकारपणे हे अल्पवयीन वाहने चालवतात. आपण शंभरच्या स्पीडने किंवा त्यापेक्षा अधिक जोरात गाडी चालवली याची खमंग चर्चाही करतात.
पालक सर्वाधिक जबाबदार –
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातून जागरूक न होता तालुक्यातील पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात वाहनांची चावी सुपूर्द करतात, ही खरे तर शोकांतिका आहे.
आपल्याकडे वाहन चालविण्यासाठीचा परवाना अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स हे अठरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय आणि वाहन चालवायचा कोर्स पूर्ण केल्याशिवाय मिळत नाही.
त्यामुळे वाहन चालवण्याचा परवाना नसताना मुलांनी वाहन चालविले आणि काही दुर्घटना घडली, तर पालकांनाच दोषी धरले जाते. त्यामुळे खरे तर पालकांनी जागरूक होणे आवश्यक आहे.
प्रबोधनाची गरज –
अतिलाडावलेली ही मुले शालेय परिसरात वाहने चालवितात, बाजारभागात कर्णकर्कश हॉर्न वाजवत सुसाट वाहने चालवितात. त्यामुळे आता खरेतर शाळा व्यवस्थापन आणि पोलिस प्रशासन यांनी याविरोधात कारवाई सुरू केली पाहिजे.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे याबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे. तर पोलिस प्रशासनाने विशेष मोहिम काढून अशा अल्पवयीन वाहन चालकांच्या अर्थात त्यांच्या पालकांवर कारवाई केली, तर हे प्रमाण नक्कीच कमी होईल.





